कोल्हापुरातून काँग्रेसकडून शाहू महाराज?
कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा ‘फॉर्म्युला’ जवळजवळ निश्चित झाला आहे. औपचारिक घोषणा तेवढी बाकी आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज हे काँग्रेसच्या तिकिटावर महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. मात्र, कोल्हापूर जागेच्या बदल्यात काँग्रेसकडून शिवसेना ठाकरे गटाला सांगली लोकसभेची जागा दिली जाणार असल्याचे समजते.
या दोन्ही जागांबाबतच्या निर्णयावर बुधवारी (दि. 6) होणार्या महाविकास आघाडी नेत्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब केले जाणार आहे. कोल्हापुरातून महाविकास आघाडीने शाहू महाराज यांच्या नावाला पसंती दिली आहे. स्वतः महाराज यांनीही निवडणूक लढवण्याबाबतची सूचक विधाने केली आहेत. शाहू महाराज हे काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, 2019 मध्ये कोल्हापुरातून शिवसेनेचे संजय मंडलिक विजयी झाले होते. ते शिंदे गटात गेले असले, तरी ठाकरे यांच्या शिवसेनेने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर आपलाच हक्क असल्याचे ठासून सांगितले आहे. कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडण्याच्या बदल्यात सांगलीची जागा शिवसेनेला द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ती नेत्यांनी मान्य केल्याचे समजते. त्यावर बुधवारच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
Latest Marathi News कोल्हापुरातून काँग्रेसकडून शाहू महाराज? Brought to You By : Bharat Live News Media.