नड्डा यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला, लोकसभा निवडणूक लढवणार?
नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला आहे. नड्डा लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे मानले जात आहे. नड्डा यांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपणार आहे. सध्या ते हिमाचल प्रदेशमधून राज्यसभेचे खासदार आहेत. गुजरातमधून राज्यसभेवर निवडून आल्यानंतर त्यांनी अद्याप शपथ घेतलेली नाही. त्यामुळे त्यांची गुजरातची निवड अजूनही अबाधित राहणार आहे.
जेपी नड्डा यांची १३ दिवसांपूर्वी २० फेब्रुवारी रोजी गुजरातमधून राज्यसभा सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली होती. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी नड्डा यांनी राज्यसभेचा राजीनामा दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ते कोणत्या जागेवरून निवडणूक लढवणार हे अद्याप जाहीर झालेले नाही.
नड्डा यांनी १९७८ मध्ये अभाविपमध्ये प्रवेश करून विद्यार्थी राजकारणाला सुरुवात केली. यानंतर ते १९९१ ते १९९४ दरम्यान भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांची पत्नी मल्लिका नड्डा या देखील १९८८ ते १९९९ अभाविप च्या राष्ट्रीय सरचिटणीस होत्या. २०१४ मध्ये मोदी सरकारमध्ये मंत्री होण्यापूर्वी, नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह अध्यक्ष असताना ते पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस होते. २०१२ आणि २०१८ मध्ये भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवले. २० जानेवारी २०२० रोजी त्यांची भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. सप्टेंबर २०२२ मध्ये जगत प्रकाश नड्डा यांचा कार्यकाळ २०२४ पर्यंत वाढवण्यात आला आहे.
Latest Marathi News नड्डा यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला, लोकसभा निवडणूक लढवणार? Brought to You By : Bharat Live News Media.