कृतिशील निसर्गप्रेम

या आठवड्यात 3 मार्च रोजी ‘जागतिक वन्यजीव दिन’ सर्वत्र साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने तर जंगलं, झाडं आणि पशुपक्ष्यांची निवासस्थानं वाचविण्यासाठी जीवाची बाजी लावणार्या गौरा देवींची आठवण निघणं हे साहजिकच!
निसर्गावर प्रेम करा असं आपण लहानपणापासून ऐकत असतो. आपल्या भवताली सार्वजनिक ठिकाणी भिंतींवर रंगवलेले किंवा सोशल मीडियावर मेसेजच्या रूपात फिरत राहणारे निसर्गप्रेमाचे संदेश आपण वाचत असतो.
निसर्गाचं संरक्षण, संवर्धन करणं मानवजातीसाठी किती आणि का महत्त्वाचं आहे याविषयी शालेय पाठ्यपुस्तकात लिहिलेलं असतं. आपली लेकरं जेव्हा ते वाचत असतात, तेव्हा परीक्षेसाठी त्यांच्याकडून ते घोकून घ्यायलाही आपण विसरत नाही. पण, प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात आपण आपलं निसर्गप्रेम कृतीत किती आणि कसं उतरवतो हा प्रश्न आपण स्वत:ला विचारून पाहतो का? वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावर आपलं निसर्गप्रेम खरोखरच ‘कृतिशील’ आहे का हे आपण तपासून पाहतो का?
‘कृतिशील’निसर्गप्रेम काय असू शकतं याचा वस्तुपाठ घालून देणारी सर्वसामान्य महिला कोण? या प्रश्नाचं उत्तर शोधताना हमखास आठवण काढली जाते ती गौरा देवींची! 3 मार्च रोजी ‘जागतिक वन्यजीव दिन’ सर्वत्र साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने तर जंगलं, झाडं आणि पशुपक्ष्यांची निवासस्थानं वाचविण्यासाठी जीवाची बाजी लावणार्या गौरा देवींची आठवण निघणं हे साहजिकच! सत्तरच्या दशकात म्हणजे जवळपास पन्नास वर्षांपूर्वी भारतात ‘चिपको आंदोलन’ झालं होतं. उत्तराखंड राज्यातल्या गढवाल भागामधील जंगलातल्या वृक्षतोडीला या आंदोलनाने आळा बसवला.
जंगलातली मोठमोठी झाडं तोडायला ठेकेदाराची माणसं पोहोचली तेव्हा जवळपासच्या गावातल्या गौरा देवींसारख्या साध्यासुध्या बायकांनी झाडांना शब्दश: मिठी मारली आणि स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कुर्हाडींच्या घावापासून या झाडांना आणि जंगलांना वाचवलं. या कृतिशील निसर्गप्रेमाची दखल अवघ्या जगाने घेतली.
आजघडीला चिपको आंदोलन, गौरा देवी यांचं स्मरण करणं महत्त्वाचं आहेच. पण, त्याही पलीकडे जाऊन आपल्या अवतीभवती विकास-विकास म्हणत निसर्गाला नख लावण्याचं काम होत नाहीये ना हे डोळसपणे पाहणं, वर्तमानातल्या तथाकथित समृद्धीसाठी भविष्यातला धोका आपण ओढवून घेत नाही ना याबाबत सतर्क राहणं हेही गरजेचं आहे. येत्या जागतिक वन्यजीव दिनाच्या निमित्ताने अशा ‘कृतिशील निसर्गप्रेमा’ची गरज तरी आपण मनोमनी जागवूया; इतकंच!
Latest Marathi News कृतिशील निसर्गप्रेम Brought to You By : Bharat Live News Media.
