एकीकडे कोट्यवधींचा महसूल; नागरिकांचे मात्र हाल

पौड : Bharat Live News Media वृत्तसेवा : तालुक्यातील पौड दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखतासाठी येणार्या नागरिकांची दैना पाहायला मिळत आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांची प्रचंड गर्दी असताना अतिशय तोकड्या असलेल्या कार्यालयात उभे राहायलासुद्धा जागा नसते. कार्यालयाबाहेर नागरिकांना मोकळ्या पटांगणात उभे राहून नंबर येण्याची वाट पाहावी लागत आहे. अनेक नागरिकांनी तहसील कार्यालय आवारात कोपरा कोपरा जागा शोधून बैठक मारल्याचे चित्र नेहमीच बघायला मिळत आहे. यानिमित महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
पुणे शहरापासून जवळ असल्याने मुळशी तालुक्यातील जमिनींना सोन्याचे भाव आले आहेत. जमीन खरेदी-विक्रीसोबतच दुय्यम निबंधक कार्यालयात फ्लॅट व विविध खरेदी-विक्री, विकसन करार, भाडेकरार, करारनामा, विविध खरेदीखत, कुलमुखत्यारपत्रे, हक्कसोड, वाटणीपत्र व इतर दस्तऐवज नोंदणी केली जाते. काळासोबत सातत्याने या कामांसाठी मोठी गर्दी पौडच्या या कार्यालयाबाहेर वाढतच चाललेली आहे. मात्र, प्रचंड गर्दी होत असलेल्या ठिकाणी नागरिकांनी शासकीय कार्यालयाच्या नावाप्रमाणेच दुय्यम वागणूक मिळत आहे.
बसायला ना जागा, ना खुर्च्या, ना पिण्याच्या पाण्याची सोय, शिस्तबद्धरीतीने रांगेत काम करवून घ्यायची सोय नाही; परिणामी नागरिकांचे येथे हाल होतात. ऊन, वारा आणि पावसात अनेक ज्येष्ठ नागरिक, पालकांसोबत आलेली लहान मुले यांना या तोकड्या कार्यालयामुळे तिष्ठत बसावे लागते. कोट्यवधी रुपयांचा महसूल गोळा करीत आहात, त्याप्रमाणे नागरिकांना प्राथमिक सुविधा देण्यासाठी या कार्यालयाचा कायापालट करावा. प्रशस्त कार्यालय असण्यासोबतच एकाचवेळी अनेक नागरिकांना येथे सावलीत बसता येईल अशी सुविधा व इतर सोयी राज्य शासनाने करून द्याव्यात, अशी मागणी मुळशीकर नागरिकांतर्फे शासनाकडे करण्यात येत आहे.
हेही वाचा
उद्धव ठाकरे आज पनवेलमध्ये; उरण- खोपोलीतही मेळावा
..तमाम शंभूभक्तांच्या भावनांचा अपमान ; खा. डॉ. अमोल कोल्हेंची सरकारवर टीका
Encounter In Chhattisgarh | छत्तीसगडमध्ये चकमक; पोलीस हवालदार शहीद
Latest Marathi News एकीकडे कोट्यवधींचा महसूल; नागरिकांचे मात्र हाल Brought to You By : Bharat Live News Media.
