पवार समोरासमोर आले; पण एकमेकांकडे बघणेही टाळले

बारामती, Bharat Live News Media वृत्तसेवा : बारामतीत आयोजित नमो महारोजगार मेळाव्याच्या निमित्ताने ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार हे पवार कुटुंबातील सदस्य शनिवारी एकाच व्यासपीठावर आले खरे; परंतु त्यांच्यात कोणताही संवाद झाला नाही. एकमेकांकडे बघणेही त्यांनी टाळले. अजित पवार यांनी भाषण संपल्यानंतर शरद पवार यांच्यासमोरून जाणे टाळले. ते मागील बाजूने खुर्चीवर स्थानापन्न झाले.
या मेळाव्याच्या निमित्ताने महायुतीने लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची तयारी केली होती. आ चारसंहितेपूर्वीच्या या कार्यक्रमाला मोठ्या ‘इव्हेंट’चे स्वरूप दिले गेले होते. परंतु, शरद पवार यांच्या व्यासपीठावरील उपस्थितीने राजकीय टीकाटिपणी झालीच नाही. महायुतीला त्यात मर्यादा आली.
विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर हा कार्यक्रम आयोजित केला गेला. शरद पवार या संस्थेचे अध्यक्ष आहेत. कार्यक्रमापूर्वीच त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भोजनाचे निमंत्रण देत गुगली टाकली होती. ते स्वतः खासदार सुळे यांच्यासह कायर्र्क्रमाला उपस्थित राहिले. विद्या प्रतिष्ठानच्या कार्यालयात त्यांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री शिंदे यांनी बारामतीच्या विकासात शरद पवार, अजित पवार यांचे योगदान असल्याचे सांगितले. पुढे त्यांच्यासह फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक केल्यानंतरही टाळ्या व शिट्ट्या वाजल्या.
बारामती लोकसभेचा सामना सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असाच होणार, हे स्पष्ट झाले आहे. व्यासपीठावर या दोघींनी एकमेकांसमोर येणे कटाक्षाने टाळले. शेजारी उभ्या असलेल्या दत्तात्रय भरणे यांच्याकडेही त्यांनी पाहणे टाळले. सुळे या मंत्रिमहोदयांना नमस्कार करण्यासाठी सुनेत्रा यांच्या जवळ गेल्या. परंतु, त्यांनी एकमेकींकडे पाहणे टाळले.
Latest Marathi News पवार समोरासमोर आले; पण एकमेकांकडे बघणेही टाळले Brought to You By : Bharat Live News Media.
