कोल्हापूर: भादोले – पेठवडगाव मार्गावर उन्मळून पडलेल्या पिंपळ झाडाला निसर्गप्रेमींकडून जीवदान

राजकुमार चौगुले
किणी: रस्त्याच्या मोरीचे बांधकाम करताना उखडून टाकलेल्या तीस वर्षांहून अधिक वयाच्या पिंपळाच्या झाडाचे पूनर्रोपण करून त्याला जीवदान देण्याचे काम पेठवडगावच्या निसर्गप्रेमी ग्रुपच्या वतीने करण्यात आले. आतापर्यंत वेगवेगळ्या वृक्षांचे या ग्रुपच्यावतीने पुनर्रोपण करण्यात आले आहे.
पेठवडगाव -लाटवडे रस्त्यालगत एक पिंपळाच्या वृक्षाचा मोठा बुंधा पडल्याची माहिती निसर्गप्रेमी मित्र ग्रुपचे अध्यक्ष डॉ. अमोल पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ जाऊन पाहिले. मोरी बांधकामावेळी हे झाड अर्धवट तोडून राहिलेल्या मुळ्या बांधकामांतून तुटून पडले होते, हे पिंपळाचे झाड अंदाजे ३० वर्षे वयाचे आहे. पडून सुद्धा त्या झाडाला पालवी फुटलेली आहे, दुर्लक्ष झाले असते तर ते झाड उन्हाच्या तडाख्यात पाण्याअभावी तसेच मुळ्या उघडे पडल्याने मृत झाले असते. त्यामुळे निसर्गप्रेमी मित्र ग्रुप ने या पिंपळाला भादोले – पेठवडगाव रस्त्याच्या बाजूला श्रीपती इंटरप्राईजेसचे सागर पाटील यांच्या अंगणात रोपण करण्याचा निर्णय घेतला.
या उपक्रमात निसर्गप्रेमी मित्र संस्थेचे डॉ अमोल पाटील, प्रकाश जगदाळे, संदीप पाटील, नेताजी पाटील, डॉ निलेश ढोबळे, डॉ. नीलिमा पाटील, डॉ. विशाल पाटील, राजेंद्र भोसले, बाजीराव माळी, सयाजी पाटील, विनोद पाटील, केदार गुरव तसेच इतर स्थानिक नागरिक सहभागी झाले. निलेश घारसे यांच्याकडून लागणारी खते, बुरशीनाशके देऊन सहकार्य केले. निसर्गप्रेमी मित्र संस्थेने पेठवडगाव परिसरात आतापर्यंत वड, पिंपळ, कळम, मोह अशी एकूण ७ झाडांचे यशस्वी पुनर्रोपण केले आहे. निसर्गप्रेमी संस्थेमार्फत देवराई निर्मिती, फुलपाखरू उद्यान, वृक्षतोड विरोध वृक्ष पूनर्रोपण, गडमोहिम स्वच्छता अभियान आदी २२ उपक्रम राबविले आहेत. त्यांना वृक्षप्रेमी अभिनेते सयाजी शिंदे, पर्यावरण तज्ज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर तसेच सुहास वायंगणकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
झाडे असतील तरच मनुष्य आणि इतर प्राणी जगू शकतात, असे असून देखील फक्त मनुष्य प्राणी स्वत:च्या स्वार्थासाठी वृक्षतोड करत आहे. त्यातून पर्यावरणाच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यासाठी मोठी वृक्ष वाचविणे आवश्यक आहे. कारण एक मोठा वृक्ष वाचविणे किंवा त्याचे पुनर्रोपण करणे हे शेकडो नवीन रोपे लावण्यासारखे आहे. याचा विचार करून सर्वांनी वृक्षसंपदा जपावी.
– डॉ. अमोल पाटील, अध्यक्ष, निसर्गप्रेमी मित्र, पेठ वडगाव
हेही वाचा
लोकसभा निवडणूक : दक्षिण गोव्याचा उमेदवार ठरवताना भाजप, काँग्रेसमोर पेच
कोल्हापूर : कुस्तीचा इतिहास कॅलेंडरवर एकवटला !
कोल्हापूर : प्रत्येक जिल्ह्यात नेत्र, त्वचा स्वीकारणी केंद्र उभारणार : हसन मुश्रीफ
Latest Marathi News कोल्हापूर: भादोले – पेठवडगाव मार्गावर उन्मळून पडलेल्या पिंपळ झाडाला निसर्गप्रेमींकडून जीवदान Brought to You By : Bharat Live News Media.
