चहावाल्याचे गारुड..!

एकंदरीत सध्या चहा वाल्यांनी देशभर धुमाकूळ घातला आहे, असे दिसून येत आहे. खरे तर चहा हे ब्रिटिशांनी लोकप्रिय केलेले पेय आहे. ब्रिटिशांनी चहा भारतात आणला, भारतीय लोकांना तो आवडला आणि त्यामुळे जगभरात चहा पिणार्यांची संख्या भारतात सर्वाधिक आहे, हे आपल्याला माहीत आहे. असे म्हणतात की, भारतीय लोकांची बशीत चहा ओतून फुरफुर आवाज करीत चहा पिण्याची पद्धत पाहूनच ब्रिटिश भारत सोडून निघून गेले. विनोदाचा भाग सोडला तरी चहा आणि भारतीय माणसाचे नाते अजोड आहे.
कित्येक वर्षे श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थानावर राहिलेले आणि जगातील एक प्रभावशाली व्यक्ती असलेले बिल गेटस् नुकतेच नागपूरमध्ये येऊन डॉलीचा चहा पिऊन गेले. नागपूरमध्ये सदर भागामध्ये कुणी एक डॉली चहावाला प्रसिद्ध आहे. त्याची चहा करण्याची विशिष्ट पद्धत आहे आणि अत्यंत लयबद्ध पद्धतीने तो चहा तयार करून आपल्या ग्राहकांना देत असतो. त्याच्या या पद्धतीमुळे त्याच्या चहाच्या टपरीवर प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. अर्थात, त्याच्या चहाची चव चांगली असणार, यात शंका नाही. त्याची ख्याती श्रीमान बिल गेटस् यांच्या कानावर गेली आणि भारतात आल्यानंतर त्यांनी नागपूर येथे भेट देऊन डॉली चायवाल्याचा चहा पिण्याचे नियोजन केले. डॉली चहावाला याचे खरे नाव कोणालाच माहीत नाही. तो आणि सोबत बिल गेटस् महोदय यांचे फोटो आणि व्हिडीओ काही तासांत जगभर व्हायरल झाले आहेत. या भागामध्ये टपरी चालवणारा चहावाला काही क्षणात संपूर्ण जगाला माहीत होतो, हा आजच्या सोशल मीडियाच्या व्याप्तीचा चमत्कार आहे, असे म्हणावे लागेल.
बिल गेटस् हे भारताच्या प्रेमात असलेले गृहस्थ आहेत. डॉलीकडे चहा पिताना त्यांनी भारताविषयी जे उद्गार काढले आहेत, ते आपणा सर्वांसाठी अभिमानास्पद असेच आहेत. भारताच्या कोपर्याकोपर्यांवर तुम्हाला काहीतरी नवीन शोध दिसेल, सर्जनशीलता दिसेल असे त्यांनी म्हटले आहे. ही खरे तर भारतीयांच्या बुद्धिमत्तेची केलेली प्रशंसाच आहे. सातत्याने नावीन्याचा शोध घेणे, आहे ती रूढ पद्धत बदलून नवीन पद्धतीने पदार्थ तयार करणे, काम करण्याच्या पद्धतीमध्ये सातत्याने बदल करणे आणि नावीन्यपूर्ण पद्धतीने आनंदाने जीवन जगणे यामध्ये भारतीयांचा हातखंडा आहे. बिल गेटस् यांनी हेच अधोरेखित केले आहे.
खरे सांगायचे तर हेच आपल्या देशाच्या यशाचे गमक आहे. उद्या या डॉली चहावाल्याने आपल्या चहा करण्याच्या पद्धतीचे पेटंट घेतले आणि जगभर डॉली चहाच्या टपर्यांची शृंखला म्हणजेच चेन उघडली, तर आश्चर्य वाटू देऊ नका; कारण भारतीय माणसांमध्ये उद्योजकताही तेवढीच आहे. सृजनशील बुद्धिमत्ता असणार्या भारतीय लोकांनी आपली बुद्धी योग्य जागी आणि योग्य पद्धतीने वापरली तर चहावालेसुद्धा जगापुढे उदाहरण म्हणून उभे राहू शकतात, हे या निमित्ताने सिद्ध झाले आहे. असाच आणखी एक चहावाला आपल्या देशाचा पंतप्रधान झाला असून, जगातील सर्वात लोकप्रिय राजकीय नेता म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणजे या दोन चहावाल्यांनी चहा विकणे यालासुद्धा ग्लॅमर प्राप्त करून दिले आहे. डॉली चहावाल्याने कधीकाळी रेल्वेस्थानकावर चहा विकलेल्या आपल्या पंतप्रधानांना कधीतरी चहा देणार, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
Latest Marathi News चहावाल्याचे गारुड..! Brought to You By : Bharat Live News Media.
