साखरेचा विक्रीदर क्विंटलला चार हजार करा

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : केंद्र सरकारने साखरेचा प्रतिक्विंटल विक्रीदर फेब्रुवारी 2019 पासून 3100 रुपये केलेला आहे. मात्र, त्यानंतरच्या काळात पाच वर्षांत उसाचा दर मात्र प्रत्येक वर्षी वाढता ठेवला आहे. त्यामुळे हा वाढीव दर शेतकर्यांना वेळेत आणि पूर्णपणे देण्यासाठी साखरेच्या किमान विक्रीदरात वाढ करून तो चार हजार रुपये करण्याची मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने केंद्रीय अधिकार्यांच्या बैठकीत केली आहे. याबाबत केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने आपल्या अहवालात दुजोरा दिला आहे.
केंद्रीय अन्न सचिव अस्वनी श्रीवास्तव, मुख्य साखर संचालक संगीत सिंगला तसेच साखर विभागातील सर्व संबंधित अधिकार्यांसमवेत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक साखर उद्योगाच्या भेडसावणार्या विविध प्रश्नांवर गुरुवारी (दि. 29) झाली. त्या वेळी झालेल्या चर्चेत ही मागणी करण्यात आल्याची माहिती महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिली. केंद्र शासनाच्या फेब्रुवारी महिन्यापासून लागू केलेल्या किमान 90 टक्के साखर कोट्याच्या विक्रीच्या बंधनामुळे साखरेच्या दरात प्रतिक्विंटलला 250 रुपयांनी घसरण झाली आहे.
राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे नूतन अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत वेगवान पद्धतीने साखर उद्योगाच्या मदतीसाठी कामाला लागला आहे. महासंघाच्या संचालक मंडळाच्या बैठका टप्प्याटप्प्याने विविध राज्यांत जाऊन आयोजित करण्यात येणार असून, त्यासोबतच विविध केंद्रीय मंत्र्यांसह भेटी घेण्याचे देखील नियोजन आहे.
महाराष्ट्रात 18 लाख टन साखर शिल्लक राहणार
महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा लांबलेला गळीत हंगाम आणि मिळणारा साखर उतारा लक्षात घेता साधारणपणे 18 लाख टन अतिरिक्त साखर हंगाम अखेर शिल्लक राहण्याचा अंदाज आहे. त्या अतिरिक्त साखरेचा वापर इथेनॉलनिर्मितीसाठी करण्याची गरज चर्चेत प्रभावीपणे मांडण्यात आली. कारखान्यांकडे शिल्लक असणार्या बी हेवी मोलॅसिसच्या साठांचा निपटारा होणे व काही प्रमाणात रस-सिरप यांचा वापर इथेनॉलकडे करणे गरजेचे असल्याचेही केंद्राच्या निदर्शनास आणून देण्यात आले असून, अजूनही यातून तयार होणार्या इथेनॉलचे नवे दर जाहीर झालेले नाहीत, याकडेही त्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.
हेही वाचा
राजीव पतसंस्थेत 4.58 कोटींचा अपहार; चेअरमनसह 15 जणांवर गुन्हा
पाचवीसह आठवीच्या प्रश्नपत्रिकांची निर्मिती शाळेतच..
आर्थिक विकासाचा अभूतपूर्व वेग!
Latest Marathi News साखरेचा विक्रीदर क्विंटलला चार हजार करा Brought to You By : Bharat Live News Media.
