मुंडे विरुद्ध मुंडेंसह शरद पवार यांचे अनेक संघर्षांना आशीर्वाद

मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा : करावं तसं भरावं लागतं. शरद पवार यांच्या आशीर्वादाने मुंडे विरुद्ध मुंडे असा संघर्ष पाहावा लागला. पवारांनी अनेक संघर्षांना आशीर्वाद दिला. विश्वासघात केला की, कालचक्र उत्तर देते, अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्यावर नाव घेऊन केली.
देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना शरद पवारांवर तोफ डागली. 2019 मध्ये फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटे शपथविधी घेऊन सरकार स्थापन केले होते; पण शरद पवार यांच्या दबावानंतर अजित पवार स्वगृही परतले आणि हे सरकार कोसळले. आता अजित पवारांना सोबत घेऊन शरद पवारांचा बदला घेतला का, या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी स्वतःला चाणक्य समजत नाही. शरद पवार असतील, मी नाही. कोणी धोका दिला, विश्वासघात केला, तर त्याला उत्तर दिले पाहिजे. राजकारणात अपमान होतात, सहन करता येतात. विश्वासघात सहन करायचा नसतो; पण बदला घेतो, असे म्हणता येणार नाही. संधी मिळाली तर फायदा घेतला पाहिजे, हे राजकारणात शिकलो. मी ईश्वरावर भरोसा ठेवला आहे. विश्वासघात होतो, तेव्हा कालचक्र उत्तर देते. मी उत्तर दिले नाही. कालचक्राने उत्तर दिले.
पवार हे महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. एक काळ त्यांनी गाजवला आहे. अजूनही ते संघर्ष करीत आहेत. मात्र, आज देशात एकच नेतृत्व मोठे वाटते. आश्वासक वाटते, ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्यांच्यावर लोकांचा पूर्ण विश्वास आहे, असेही ते म्हणाले.
Latest Marathi News मुंडे विरुद्ध मुंडेंसह शरद पवार यांचे अनेक संघर्षांना आशीर्वाद Brought to You By : Bharat Live News Media.
