करंजी परिसरात जंगलाला वणवा; नुकसानीबाबत वन विभाग मात्र अनभिज्ञ
करंजी : Bharat Live News Media वृत्तसेवा : तिसगाव वनपरिक्षेत्र हद्दीतील करंजी येथील वन विभागाच्या जंगलाला आग लागून मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे जळून खाक झाली. दरवर्षीच मार्च-एप्रिलदरम्यान येथील जंगलाला मोठी आग लागून मोठे नुकसान होत आहे. यंदादेखील करंजीच्या जंगलाला पायघोटका, घोरदरा परिसरात बुधवारी दुपारच्या सुमारास आग लागून जंगलाचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली. वन विभागाच्या माध्यमातून दरवर्षी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी लाखो रुपये खर्च करून जून-जुलै महिन्यामध्ये वृक्षारोपण केले जाते. या वृक्षारोपणातून नव्याने लावलेली किती झाडे मोठी होतात हा प्रश्न अधांतरीत असला, तरी जंगलातील आहे त्या झाडांचे संरक्षण करणेसुद्धा वन विभागाला तारेवरची कसरत ठरत आहे.
गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने करंजी, दगडवाडी, भटेवाडी या परिसरातील जंगलाला मोठ्या प्रमाणात आग लागून वन विभागाचे झालेले नुकसान याला जबाबदार कोण हा प्रश्न निसर्गप्रेमींकडून आता उपस्थित केला जात आहे. वरिष्ठ अधिकार्यांनी नेहमीच लागणार्या या आगींबाबत संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे. बुधवारी दुपारनंतर लागलेली ही आग वन विभागाच्या कर्मचार्यांनी विझवण्याचा प्रयत्न केला असला, तरी सायंकाळपर्यंत ही आग जंगलामध्ये धुमसत होती.
वन विभागाच्या कार्यपद्धतीवर शंका
सलग दोन वर्षांपासून करंजी परिसरातील वन विभागाच्या जंगलाला आग लागत असून, यावर्षी जंगलाला आग लागणार नाही यासाठी वन विभाग सतर्क राहील असे वाटत असतानाच करंजीजवळील जंगलाला बुधवारी आग लागली. असे असतानाही कारवाई मात्र कोणावरच केली जात नाही. त्यामुळे वन विभागाच्या कार्यपद्धतीवर शंका निर्माण केली जात आहे.
आगीत वन विभागाचे नेमके किती हेक्टर क्षेत्र जळाले हे निश्चितपणे सांगू शकत नाही. परंतु येथील काही लोकांना जंगलात जनावरे चारायला विरोध केला, म्हणूनच ही आग लावली असल्याची माहिती समजली आहे. त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल.
– दादासाहेब वाघुळकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, तिसगाव
हेही वाचा
कंटेनर-दुचाकी अपघातात एक ठार, दोन जखमी : पांढरीपुलावरील घटना
पालघर : दांडी येथे पिसाळलेल्या श्वानाचा नऊ जणांना दंश
महामार्गासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून तीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू
Latest Marathi News करंजी परिसरात जंगलाला वणवा; नुकसानीबाबत वन विभाग मात्र अनभिज्ञ Brought to You By : Bharat Live News Media.