महिलांपाठोपाठ आता तरुणाईला भाजपची साद; सोमवारी नमो युवा महासंमेलन
नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा: बचत गट महिला मेळाव्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच यवतमाळ येथे लोकसभा निवडणुकीचा शंखनाद केला. आता भाजप, संघ परिवाराच्या राष्ट्रवादी विचारधारेच्या दृष्टीने महत्त्वाचे स्थान असलेल्या नागपुरात येत्या सोमवारी (दि.4) राष्ट्रीय नमो युवा महासंमेलन होत आहे.
अमरावती मार्गावरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात आयोजित हे देशातील सर्वात मोठे युवा संमेलन ठरेल. याची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यात देशभरातील युवक सहभागी होणार असले तरी एकट्या महाराष्ट्रातून 1 लाख युवक सहभागी होतील.
नागपूर जिल्ह्यातून 40 हजार युवक सहभागी होणार असल्याची माहिती भाजयुमो राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी दिली. 2014 आणि 2019 मध्ये युवकांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारला आशीर्वाद देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कोट्यवधी युवकांच्या समर्थनामुळेच 30 वर्षांनंतर देशात पूर्ण बहुमताचे सरकार येऊ शकले. 2024 च्या निवडणुकीतही युवकांचे समर्थन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे देशातील युवकांना जोडण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असून नागपुरात होणारे नमो युवा महासंमेलनही त्याचाच भाग असल्याचे सूर्या यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, विद्यापीठ परिसरात होणाऱ्या या युवा संमेलनाची पूर्वतयारी जोरदार सुरू असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यापीठाच्या परिसराचा राजकीय उपयोग होऊ नये, अशी मागणी केल्याने हे संमेलन चर्चेत आले आहे. भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, शिवाणी दाणी, माजी आमदार डॉ. आशिष देशमुख आदी यासाठी परिश्रम घेत आहेत.
हेही वाचा
Nagpur IT Hub : नागपूर होतेय ‘आयटी हब’ : वारंगा परिसरात ट्रिपल आयटी उद्घाटन
नागपूर : बेसा परिसरात वैद्य इंडस्ट्रीत भीषण आग
नागपूरच्या युवा संगीतकार व गीतकार श्रेयस पुराणिकला दोन फिल्मफेअर पुरस्कार
Latest Marathi News महिलांपाठोपाठ आता तरुणाईला भाजपची साद; सोमवारी नमो युवा महासंमेलन Brought to You By : Bharat Live News Media.