Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने ( Maha Vikas Aghadi) जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित केला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ((UBT) २१ जागा लढवण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस १५ जागांवर लढू शकते. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला ९ जागा मिळू शकतात, असे वृत्त इंडिया टुडेने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी (VBA) २ जागा लढवण्याची शक्यता आहे. तर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक जागा मिळण्याची शक्यता आहे, असे पुढे सुत्रांनी म्हटले आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, वर्षा गायकवाड, शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुख, तर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि विनायक राऊत या बैठकीवेळी उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते.
संजय राऊत यांनी म्हटले आहे की महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक होईल आणि जागावाटप फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब केले जाईल. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्याची घोषणा केली जाईल.
“लोकसभेच्या ४८ जागांवर सविस्तर चर्चा झाली. कोण, किती जागा लढवतो हे महत्त्वाचे नाही, तर जिंकणे महत्त्वाचे आहे,” असे राऊत यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची अधिकृत घोषणा आघाडीतील वरिष्ठ नेत्यांकडून केली जाणार आहे.
नेमकं काय ठरलं?
विशेष म्हणजे, प्रत्येक पक्षाला एक जागा दिली जाईल; ज्यामध्ये एक विद्यमान खासदार असेल. जर का एका पक्षाचा उमेदवार दुसऱ्या पक्षात गेला तरी, ज्या मूळ पक्षाला निवडणूक लढवण्यासाठी जागा मिळाली, त्याच पक्षाला तिकीट मिळेल, असे ठरले असल्याचे समजते.
दरम्यान, काँग्रेस नेते ४ मार्च रोजी लोकसभा उमेदवारीबाबत दिल्लीत महत्त्वाची बैठक घेणार आहे. त्यानंतरच उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार आहेत.
निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर केलेल्या नाहीत. ही निवडणूक एप्रिल-मे दरम्यान होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने राज्यात लोकसभेच्या २३ जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादीने ४ तर काँग्रेस आणि एमआयएमने प्रत्येकी एक जागा जिंकली होती. एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला होता.
हे ही वाचा :
सत्तेच्या हव्यासापोटी अधिकारांचा गैरवापर : विधीमंडळात अनिल परब यांचे भाजपवर आरोप
शरद पवार यांचे महायुतीला निमंत्रण; ‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्वजण आमच्या घरी जेवायला या’
Latest Marathi News लोकसभेसाठी ‘माविआ’चं ठरलं! ठाकरे २१ जागा लढणार, ‘वंचित’, ‘स्वाभिमानी’ला किती जागा? Brought to You By : Bharat Live News Media.