कोल्हापूर : मृतदेह निघाला दुसऱ्याचाच; स्मशानभूमीत उडाली खळबळ
शिंगणापूर : Bharat Live News Media वृत्तसेवा; मुंबई येथील हिंदुजा रुग्णालयात मृत्यू झालेल्या वरणगे (ता. करवीर) येथील कृष्णात पाटील (वय ४७) यांचा मृतदेहच बदलल्याचे अंत्यसंस्कारावेळी लक्षात आले. वृद्धाचा मृतदेह पाहून स्मशानभूमीत एकच खळबळ उडाली. हा प्रकार लक्षात येताच नागरिकांनी संताप व्यक्त करत रुग्णवाहिका चालकाला धारेवर धरले. तसेच फोनवरून हिंदुजा हॉस्पिटल प्रशासनाला जाब विचारला. सगळा प्रकार लक्षात येताच बदललेला मृतदेह मुंबईला परत पाठवला. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत कृष्णात पाटील यांचा मृतदेह आणण्याची प्रक्रिया सुरू होती. (Kolhapur News)
चेहऱ्यावरील कापड हटवले अन दुसऱ्याच व्यक्तीचा मृतदेह
याबाबतची माहिती अशी, वरणगे येथील भैरवनाथ हायस्कूलमध्ये शिपाई पदावर काम करणारे कृष्णात महादेव पाटील हे गेल्या दहा दिवसांपासून आजारी होते. आजार बळावल्यामुळे हिंदुजा हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारांसाठी दाखल न करण्यात आले होते. तेथे कृष्णात यांचा गुरुवारी (दि. २९) पहाटे आकस्मिक मृत्यू झाला. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये च त्यांची पत्नी मेघा आणि नातेवाईक के उपस्थित होते. धष्टपुष्ट आणि आपल्या कुटुंबप्रमुखाचा आकस्मिक मृत्यू झाल्याने त्यांची पत्नी व भाऊ भेदरलेल्या अवस्थेत होते. यावेळी, हॉस्पिटल प्रशासनाने नातेवाईकांना कृष्णात यांच्या मृतदेहाऐवजी ७६ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह कापडामध्ये गुंडाळून दिला. मृतदेह घेऊन नातेवाईक अॅम्ब्युलन्सद्वारे सहा तासांचा प्रवास करत वरणगेत आले. (Kolhapur News)
कापडामध्ये गुंडाळलेला मृतदेह ग्रामस्थांनी थेट स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नेला. शेवटचे पाणी पाजण्यासाठी मृतदेहाच्या चेहऱ्यावरील कापड हटवले. त्यावेळी मृतदेह कृष्णात यांचा नसून दुसऱ्याच व्यक्तीचा असल्याचे त्यांचा मुलगा प्रसाद याच्या लक्षात आले. ही बाब ग्रामस्थ व नातेवाईकांच्या निदर्शनास आली आणि एकच खळबळ माजली. यावेळी संबंधित रुग्णवाहिकेच्या चालकाला धारेवर धरले, तसेच हॉस्पिटलमध्ये फोन करून मृतदेह बदलल्याची घटना सांगितली. त्यावेळी हॉस्पिटलकडून झालेली चूक मान्य करून कृष्णात यांचा मृतदेह हॉस्पिटलमध्ये आहे तो पुन्हा घेऊन जाण्यासाठी नातेवाईकांनी यावे, असे सांगितले. बदललेला मृतदेह घेऊन अॅम्ब्युलन्स मुंबईकडे रवाना झाली.
स्वप्न पूर्ण होण्याआधीच काळाने कृष्णात यांच्यावर झडप
कृष्णात पाटील यांनी अत्यंत कष्टातून संसार करत एका मुलाला डॉक्टर, तर दुसऱ्या मुलाला अधिकारी बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. परंतु, स्वप्न पूर्ण होण्याआधीच काळाने कृष्णात यांच्यावर झडप घातली. मनमिळाऊ, जिद्दी, कष्टाळू व्यक्तिमत्त्वाच्या कृष्णात यांचे अकाली निधन आणि मृतदेह बदलल्याच्या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, आई असा परिवार आहे.
Kolhapur News : सकाळपासून रात्रीपर्यंत लोक ताटकळले
अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत आलेल्या पै-पाहुणे, मित्रमंडळींना प्रचंड मनस्ताप झाला. सर्वांनी हॉस्पिटलच्या गलथान कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला. चौकशीची मागणीही केली. सकाळी दहा वाजल्यापासून मृतदेहाच्या प्रतीक्षेत ताटकळत बसलेले लोक सायंकाळी पाच वाजता माघारी फिरले; तर काहीजण पुन्हा येणाऱ्या कृष्णात यांच्या मृतदेहाची रात्री उशिरापर्यंत वाट पाहत थांबले होते.
हेही वाचा
Stock Market Updates | GDP वाढीमुळे शेअर बाजाराचा मूड पॉझिटिव्ह! गुंतवणूकदारांनी काही क्षणांत कमावले ३ लाख कोटी
Air India Fined : मुंबई विमानतळावर ८० वर्षीय वृद्धाचा मृत्यू, DGCAने एअर इंडियाला ठोठावला ३० लाखांचा दंड
Latest Marathi News कोल्हापूर : मृतदेह निघाला दुसऱ्याचाच; स्मशानभूमीत उडाली खळबळ Brought to You By : Bharat Live News Media.