नाशिकच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी घेतली पक्षप्रमुखांची भेट
नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा
आगामी लोकसभा निवडणुकीत गद्दारांना गाडा. आपापसातील मतभेद – मनभेद बाजूला सारून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मोठ्या फरकाने निवडून आणा. निवडणुकीच्या तयारीला लागा, असा आदेश शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना दिला.
लोकसभा संघटकपदी विजय करंजकर, जिल्हाप्रमुखपदी सुधाकर बडगुजर, तर महानगरप्रमुखपदी विलास शिंदे यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसह नाशिकमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि. २९) मुंबईत ‘मातोश्री’वर पक्षप्रमुख ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ठाकरे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना आगामी लोकसभा निवडणूक पक्षासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. निवडणुकीसाठी बूथरचना सक्षमपणे राबवा. प्रत्येक बूथवर बूथप्रमुखांची नेमणूक करून जबाबदारीचे वाटप करा. केंद्रातील भाजप आणि राज्यातील महायुती सरकारचे अपयश घरोघरी पोहोचवा. प्रत्येक बूथवरीला यादीतील किमान अडीचशे मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क करून महाविकास आघाडीची भूमिका पटवून द्या. जबाबदारी दिली आता ती पूर्ण करून दाखवा, अशा सूचनादेखील ठाकरे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना केल्या. ठाकरे यांनी सुमारे अर्धा तास या पदाधिकाऱ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. निवडणुकीचा कानमंत्रही दिला. यावेळी खा. संजय राऊत यांच्यासह सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, माजी महापौर वसंत गिते, विनायक पांडे, डी. जी. सूर्यवंशी, दीपक दातीर, अस्लम मणियार आदी उपस्थित होते.
आदित्य ठाकरेंची ३ मार्चला घोटीत सभा
लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी ठाकरे गटाने केली आहे. उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या राज्यभर जाहीर सभा होणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रविवार, दि. ३ मार्च रोजी नाशिक लोकसभा मतदारसंघातील घोटी येथे आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. याबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा:
Stock Market Updates | GDP वाढीमुळे शेअर बाजाराचा मूड पॉझिटिव्ह! गुंतवणूकदारांनी काही क्षणांत कमावले ३ लाख कोटी
संकेश्वरजवळ शॉर्टसर्किटमुळे ट्रॅव्हल बस जळून खाक; सुदैवाने ४० जणांचे प्राण वाचले
Nashik Crime Latest News : घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद
Latest Marathi News नाशिकच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी घेतली पक्षप्रमुखांची भेट Brought to You By : Bharat Live News Media.