पुणे : वाहतूक कोंडीतून सुटका होणार कधी?
धनकवडी : Bharat Live News Media वृत्तसेवा : त्रिमूर्ती चौकाकडून दत्तनगरकडे जाणार्या राजमाता भुयारी मार्गातून समोरचा रस्ता सर्विस रोडच्या कामासाठी अचानक रात्री खोदल्याने गुरूवारी सकाळपासूनच दत्तनगर चौकात वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे सकाळी साडेआठ ते दुपारी साडेबारापर्यंत वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
राजमाता भुयारी पुलाच्या समोर सर्विस रस्त्याच्या कामासाठी रात्री रस्ता खोदल्याने समोरून ये-जा करणारी वाहने ठप्प झाली. परिणामी, त्या वाहतुकीचा ताण इतर चारही रस्त्यांवर पडला. दत्तनगर चौक ते नर्हेकडे जाणारा रस्ता, दत्तनगर भुयारी मार्ग ते चंद्रभागानगर चौक, दत्तनगर चौकाकडून कात्रजकडे जाणार्या चौकापर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीचा परिणाम म्हणजे बाह्यवळण कात्रज चौकातून नवले पुलाकडे जाणार्या रस्त्यावरही लांबलचक रांग लागली होती.
राजमाता भुयारी मार्गाच्या समोरील दत्तनगरकडे जाणारा रस्ता खोदल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली. परिणामी, या ठिकाणी चौकात वाहतूक कोंडी होऊन इतर चौकांतही वाहतूक कोंडी झाली. खोदकाम केलेल्या ठेकेदारालाही समज देण्यात आली.
– विजय टिकोळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भारती विद्यापीठ वाहतूक विभाग
जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार का ?
वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर याच रस्त्याने एखाद्या रुग्णास रुग्णवाहिका हॉस्पिटलमध्ये जायचे झाल्यास कसे जाणार ? एक-दोन नागरिक जीवाला मुकल्यावर प्रशासन जागे होणार का, असा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे. आजच दुपारी खोदलेला रस्ता दुरुस्त करून वाहतुकीस खुला करण्यात आला त्यामुळे वाहतूक सुरळीत होणार आहे.
पाटील वस्ती डीपी रस्त्याची प्रतीक्षा
धानोरी : लोहगावचा काही भाग अनेक दशकांपासून महापालिका हद्दीत आहे, मात्र या भागातील विकास आराखड्यातील रस्ते अजूनही जुन्याच स्थितीत आहेत. वाढती लोकसंख्या आणि वाहने यांना हे रस्ते अपुरे पडत आहेत. वाहतूक कोंडी, अपघात यांमुळे नागरिक मेटाकुटीला आले असून, विकास आराखड्यातील रस्त्यांना मुहूर्त कधी मिळणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
लोहगाव (संतनगर) ते पुणे-नगर महामार्ग यांना जोडणारा विकास आराखड्यातील पाटील वस्ती रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या रस्त्याची लांबी सुमारे तीन किलोमीटर व रुंदी तीस मीटर आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून भविष्यात फाईव्ह नाईन – लोहगाव रस्ता बंद करण्यात येणार आहे. बांधकाम साहित्याची वाहतूक करणारी वाहने, टँकर, चाकरमाने यांच्या वाहनांची या रस्त्यावर मोठी गर्दी असते.
पाटील वस्ती रस्त्याची फक्त पाहणी होते, पण रस्ता होत नाही. अनेक वर्षांपासून रस्ता रखडला आहे. हा रस्ता झाल्यास लोहगावकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होऊन लोहगावचा कायापालट होईल. – रमेश खांदवे, सरचिटणीस, पुणे शहर काँग्रेस
लोहगावचा काही भाग महापालिका हद्दीत जाऊन अनेक वर्षे झाली आहेत. वारंवार पाहणी होऊनही रस्त्याचे काम काही होत नाही. पाटील वस्ती रस्त्याला समांतर रस्त्यावर अनेक ठिकाणी बांधकामे होत आहेत. त्यामुळे भविष्यात नागरिकांचे मोठे नुकसान होऊ शकते.
– प्रीतम खांदवे, माजी उपसरपंच, लोहगाव.
या रस्त्याला आम्ही प्राधान्य दिलेले आहे. एका महिन्यात या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम चालू होणार आहे.
– विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका.
हेही वाचा
इथे तरुणी करतात सर्रास धूम्रपान : 20 ते 35 वयोगटातील प्रमाण जास्त
चाहुल उन्हाळ्याची : माघातच पेटला वैशाख वणवा
मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांची धावाधाव : हॉस्पिटल, वसतिगृह वेगवेगळ्या ठिकाणी
Latest Marathi News पुणे : वाहतूक कोंडीतून सुटका होणार कधी? Brought to You By : Bharat Live News Media.