GDP वाढीमुळे शेअर बाजाराचा मूड पॉझिटिव्ह! गुंतवणूकदारांनी काही क्षणांत कमावले ३ लाख कोटी
Bharat Live News Media ऑनलाईन : भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असल्याच्या जीडीपी आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात शुक्रवारी तेजी पसरली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ७०० अंकांनी वाढून ७३,२०० वर गेला. सकाळी १०.३० वाजता सेन्सेक्स ७२५ अंकांच्या वाढीसह ७३,२२६ वर होता. तर निफ्टी २२३ अंकांनी वाढून २२,२०० वर होता.
द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, बाजारातील सुरुवातीच्या तेजीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात ३.२३ लाख कोटींची वाढ होऊन ते ३९१.१८ लाख कोटींवर पोहोचले.
सेन्सेक्सवर जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, एलटी, टाटा मोटर्स, टायटन, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी, इंडसइंड बँक, पॉवर ग्रिड, बजाजा फायनान्स हे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत. तर इन्फोसिस, एचसीएल टेक शेअर्समध्ये किरकोळ घसरण दिसून येत आहे.
क्षेत्रीय आघाडीवर निफ्टी ऑटो १ टक्क्यांनी वाढला आहे. निफ्टी मेटल, पीएसयू बँक आणि ऑइल आणि गॅस निर्देशांकदेखील प्रत्येकी सुमारे १ टक्क्यांनी वाढले आहेत. निफ्टी मिडकॅप १०० आणि निफ्टी स्मॉलकॅप १०० देखील हिरव्या चिन्हात व्यवहार करत आहेत.
जीडीपी दर ८.४ टक्क्यांवर
३१ डिसेंबर २०२३ अखेरच्या तिमाहीत भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा (जीडीपी) दर ८.४ टक्क्यांवर गेल्याची माहिती केंद्र सरकारने दिली. २०२३-२४ या चालू वर्षात देशाचा जीडीपी ७.६ टक्क्यांवर जाणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सांख्यिकी विभागाने (एनएसओ) जीडीपीसंदर्भातील अहवाल गुरुवारी प्रसारित केला. यामध्ये म्हटल्यानुसार, गेल्या वित्तीय वर्षात भारताचा विकास दर ७ टक्क्यांवर राहिला आहे.
३१ डिसेंबरअखेरच्या तिमाहीत विकास दर ८.४ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या दीड वर्षात प्रथमच जीडीपी उच्चांकी स्तरावर पोहोचला आहे. ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीतील जीडीपी गेल्या वर्षातील जीडीपी दराहून अधिक आहे. गेल्या तीन वर्षात ७.६ टक्क्यापर्यंत जीडीपी पोहोचला होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अंदाजापेक्षाही विकास दर चांगला राहणार आहे. बांधकाम आणि उत्पादन क्षेत्रात चालू वर्षी तेजी पाहावयास मिळणार असल्याने विकास दर झेपावण्यास मदत होणार असल्याचेही यामध्ये म्हटले आहे. सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीतून भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनएसओच्या अहवालानंतर व्यक्त केली.
जागतिक सकारात्मक संकेत
अमेरिकेतील निर्देशांक काल वाढून बंद झाल्यानंतर आशियाई बाजारातही पॉझिटिव्ह ट्रेंड दिसून येत आहे. जपानच्या निक्केईने शुक्रवारी नवीन विक्रमी उच्चांक गाठला.
परदेशी गुंतवणूकदारांचा खरेदीचा मूड
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारात खरेदीचा मूड दिसून येत आहे. गुरुवारी परदेशी गुंतवणूकदारांनी ३,५६८ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले, तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी २३० कोटी रुपयांचे शेअर्स विकले. त्याआधीच्या महिन्यात देशांतर्गत शेअर बाजारातून सुमारे २५ हजार कोटींची रक्कम काढून घेतल्यानंतर त्यांनी फेब्रुवारीमध्ये ५,१०७ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची खरेदी केली आहे.
हे ही वाचा :
सेन्सेक्स ७२,५०० वर बंद, ‘हे’ शेअर्स तेजीत, मार्केटमध्ये आज काय घडलं?
विमा उतरवतानाचे अर्थगणित
Latest Marathi News GDP वाढीमुळे शेअर बाजाराचा मूड पॉझिटिव्ह! गुंतवणूकदारांनी काही क्षणांत कमावले ३ लाख कोटी Brought to You By : Bharat Live News Media.