भागवत बंधूची काही तासांतच सुटका; नाशिक पोलीसांची यशस्वी कामगिरी
नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा
येवला पंचायत समितीचे माजी उपसभापती व शिवसेनेचे माजी पदाधिकारी रूपचंद भागवत व विष्णू भागवत या दोघा भावांचे ४ कोटी १० लाख रुपयांच्या मागणीसाठी सीबीएस परिसरातून बुधवारी (दि.२८) सायंकाळी अपहरण झाले. अपहरणकर्त्यांनी दोघांकडे पैशांची मागणी करून अहमदनगर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सोडून देत पसार झाले. अपहरण झालेल्या विष्णू भागवत यांनी विविध योजनांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केली आहे. त्यामुळे गुंतवलेली रक्कम परत घेण्यासाठी दोघांचे अपहरण झाल्याची चर्चा आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, भागवत बंधू कामानिमित्त बुधवारी (दि.२८) जिल्हा न्यायालयात आले होते. सायंकाळी सात वाजता सीबीएस परिसरात कार पार्क केलेल्या ठिकाणी आले असता अपहरणकर्त्यांनी त्यांना दुसऱ्या कारमध्ये डांबून अपहरण केले. हा प्रकार उघड झाल्यानंतर शहर पोलिसांनी तातडीने सूत्र फिरवून शोध सुरू केला. अपहरणाचा प्रकार परिसरातील सीसीटीव्हीतही कैद झाल्याचे समजते. अपहरणकर्ते नाशिक जिल्ह्याबाहेर गेल्याचे पोलिसांना समजल्याने त्यांनीही पथके रवाना केली. दरम्यान, अपहरणकर्त्यांनी गुरुवारी (दि.२९) सुरुवातीस रूपचंद भागवत यास पैशांची व्यवस्था करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात सोडले. त्यानंतर दुपारच्या सत्रात विष्णू भागवत यांची सुटका केली. त्यानंतर संशयित पसार झाले. दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाने एका संशयितास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात रूपचंद रामचंद्र भागवत (३९, रा. गवंडगाव, ता. येवला) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित वेदांत येवला, प्रशांत, संभाजी, सुनील, राकेश सोनार व इतर चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
संशयितांनी अपहरण करण्यासाठी तीन कार वापरल्याचे समोर आले आहे. त्यात एमएच ०४ डीएन ९६७७, पांढऱ्या रंगाची एक्सयूव्ही कार व संशयित राकेश सोनार याच्याकडील कार पोलिस तपासात समोर आली आहे. संशयितांनी भागवत बंधूंचे अपहरण करून ४ कोटी १० लाख रुपयांची मागणी केली. तसेच पैशांची तजवीज करण्यासाठी सोडून दिल्याचे उघड झाले आहे.
भागवत विरोधात फसवणुकीचे गुन्हे
गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना गंडवल्याप्रकरणी श्री माउली मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑप सोसायटी व संकल्पसिद्धी प्रॉडक्ट प्रा. लि. कंपनीसह संचालक विष्णू भागवत व इतरांविरोधात शहरात गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी पोलिसांनी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केली असून, बँक खाती गोठवली आहेत. त्यामुळे फसवणूक झालेल्यांपैकीच काहींनी भागवत बंधूंचे अपहरण केल्याची चर्चा आहे.
हेही वाचा:
दै. Bharat Live News Mediaच्या पाठपुराव्याला यश : डिफेन्स क्लस्टर हब उभारणीतील अडचणी दूर
झटपट वजन घटवताय?; शरीरावर हाेतात ‘हे’ दूरगामी परिणाम
अकरा आठवड्यांच्या बाळाच्या मेंदूसारखा कृत्रिम मेंदू
Latest Marathi News भागवत बंधूची काही तासांतच सुटका; नाशिक पोलीसांची यशस्वी कामगिरी Brought to You By : Bharat Live News Media.