उणे २५ अंश सेल्सिअस तापमानात लग्नसोहळा!
अहमदाबाद : ‘हौसेला मोल नाही’ असे म्हणतात ते खरेच आहे. त्यातच जर लग्नाची गोष्ट असेल तर मग काय बोलायलाच नको! सध्याच्या काळात डेस्टिनेशन वेडिंगचा ट्रेंड वाढला आहे. ‘वधू’ तसंच ‘वर’ हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी डेस्टिनेशन वेडिंग करताना आपल्याला दिसून येतात. गुजरातमधील असेच एक जोडपेही त्यांचं लग्न अविस्मरणीय करण्यासाठी हिमाचलच्या लाहौल स्पिती जिल्ह्यात डेस्टिनेशन वेडिंग करताना दिसून आलंय. लाहौल स्पिती जिल्ह्यात सध्या तापमान उणे 25 ते 30 अंशांवर पोहोचले आहे. अशा स्थितीत डेस्टिनेशन वेडिंग करणं जीवावर बेतण्यासारखच आहे. लाहौल स्पितीला बर्फाचं वाळवंटदेखील म्हटलं जातं.
या जोडप्यासाठी लाहौल-स्पिती जिल्ह्यातील मोरंग गावात हिमवृष्टीदरम्यान डेस्टिनेशन वेडिंगसाठी मंडप सजवण्यात आला. या दोघांनी तिथे हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे मंत्रोच्चारासह सात फेरे घेतले. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लाहौल स्पिती जिल्ह्यात दरवर्षी हिवाळ्यात मोठीच हिमवृष्टी होते. या कालावधीत इथं फारच कमी वाहतूक होत असते. स्थानिक लोकदेखील अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडतात. सोमवारी मोरंग गावात बर्फात सजवलेला मंडप पाहिल्यावर गावकर्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.
सुरुवातीला गावकर्यांना वाटलं की, गावात एखाद्या चित्रपटाचं चित्रीकरण होत आहे. पण चौकशी केल्यावर येथे लग्न होत असल्याचं समोर आलं, असं गावचे स्थानिक रहिवासी कलजंग यांनी सांगितलं. एक मिनिटापेक्षा जास्त असलेल्या या व्हिडीओमध्ये बर्फानं वेढलेल्या पर्वतांमध्ये काही वाहनं उभी असल्याचं दिसत आहे. वधू कारमधून बाहेर पडताच तिचे फोटो काढताना कॅमेरामन दिसत आहे. तसंच लग्नासाठी बर्फात सजवलेला मंडप दिसून येतोय. नंतर व्हिडीओमध्ये वधू मंडपाकडं येताना दिसत आहे. मंडपाच्या आजूबाजूलाही काही लोक दिसतात. यापैकी काही वधू-वरांचे मित्र, नातेवाईक असल्याचं दिसतंय, तर काही स्थानिक लोकही तिथं उभे आहेत.
थंडीमुळं डोक्यापासून पायापर्यंत सर्वजण लोकरीचे कपडे, जॅकेट, टोप्या घातलेले दिसून येत आहेत. हिमवृष्टीदरम्यान मंडप सजवून लग्नाचे विधी पार पाडावेत यावर प्रेयसी ठाम होती, असा दावा केला जात आहे. त्यासाठी पूर्ण तयारीनिशी वर्हाडी मंडळी गुजरातहून स्पितीच्या मोरंग गावात पोहोचली. त्यानंतर तिथं मंडप सजवण्यात आला. लाहौल- स्पितीचे जिल्हा मुख्यालय असलेल्या काझापासून मोरंग गाव सुमारे 20 किलोमीटर अंतरावर आहे. हे क्षेत्र समुद्रसपाटीपासून सुमारे 12 हजार फूट उंचीवर आहे. या काळात येथे हिमवृष्टी होत असल्यामुळं तापमान उणे 25 ते 30 अंशांपर्यंत पोहोचतं. काझा येथील जनसंपर्क विभागाचे सहायक अधिकारी अजय बनियाल यांनीही हा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया पेजवर पोस्ट केला आहे.
Latest Marathi News उणे २५ अंश सेल्सिअस तापमानात लग्नसोहळा! Brought to You By : Bharat Live News Media.