बिल गेटस्नी पिला नागपूरच्या चहावाल्याचा चहा!
नागपूरः एकेकाळी सलग अनेक वर्षे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले ‘मायक्रोसॉफ्ट’चे सहसंस्थापक बिल गेटस् आपल्या दारात आले तर साहजिकच कुणीही हरखून जाईल. आता नागपूरमधील एक चहावाला असाच हरखून गेला आहे. चहा बनवण्याच्या अनोख्या पद्धतीमुळे आधीच प्रसिद्ध असलेला हा ‘डॉली चायवाला’ आता त्याच्या हातचा चहा बिल गेटस्नी पिल्याने आणखी प्रसिद्ध झाला आहे.
नागपूरच्या या चहावाल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झालेले आहेत. त्याची चहा बनवण्याची स्टाईलच ‘हट के’ आहे. अनेक फूड ब्लॉगर्स त्याच्यासमवेत व्हिडीओ बनवत असतात. याशिवाय डॉली आपली हेअरस्टाईल आणि कपड्यांच्या स्टाईलमुळेही फेमस आहे. आता त्याच्याकडे बिल गेटस्ही चहा पिऊन गेले. त्यांनी डॉलीसमवेतचा एक व्हिडीओ शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘भारतात तुम्ही सर्वच ठिकाणी ‘इनोव्हेशन’ (नवे शोध) पाहू शकता. इतकं की एक कप चहा बनवण्यातही!’
व्हिडीओत डॉली चहावाला कसा अनोख्या स्टाईलने चहा बनवतो हे दाखवण्यात आले आहे. व्हिडीओच्या टेक्स्टमध्ये बिल गेटस् यांनी लिहिले आहे की, पुन्हा भारतात आल्याने ते उत्साहित आहेत. भारत हे इनोव्हेशनचे घर आहे! या व्हिडीओला 8.2 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.
Latest Marathi News बिल गेटस्नी पिला नागपूरच्या चहावाल्याचा चहा! Brought to You By : Bharat Live News Media.