सात हजार वर्षांपूर्वी झाला होता सर्वात मोठा ज्वालामुखी उद्रेक
टोकियो : संशोधकांनी इतिहासातील सर्वात मोठ्या ज्वालामुखीची माहिती शोधली आहे. हा उद्रेक तब्बल 7300 वर्षांपूर्वी पाण्याखाली झाला होता. त्यामधून इंडोनेशियाच्या माऊंट ताम्बोराच्या 1815 मधील उद्रेकावेळी बाहेर पडलेल्या दगड व राखेच्या दुप्पटीपेक्षा अधिक सामग्री बाहेर पडली होती. अवघ्या पृथ्वीलाच हादरून सोडणारा हा ज्वालामुखीचा उद्रेक जपानच्या क्युशु बेटाच्या दक्षिणेस समुद्रात झाला होता. त्याला ‘किकाई-अकाहोया’ असे नाव आहे.
याठिकाणी फिलिपाईन टेक्टॉनिक प्लेट युरेशियन प्लेटच्या खाली घसरते. तिथे असलेल्या या किकाई ज्वालामुखीचा गेल्या 1 लाख 40 हजार वर्षांमध्ये तीनवेळा मोठा उद्रेक झालेला आहे. त्यापैकीच सर्वात अलीकडचा उद्रेक 7300 वर्षांपूर्वीचा आहे. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘जर्नल ऑफ व्होल्कॅनोलॉजी अँड जिओथर्मल रिसर्च’मध्ये देण्यात आली आहे. संशोधकांना या उद्रेकाची आधीपासूनच माहिती होती.
मात्र, नव्या संशोधनामध्ये हा उद्रेकच जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा ज्वालामुखी उद्रेक असल्याचे निष्पन्न झाले आहे. फ्रान्सच्या क्लेरमोंट युवर्न युनिव्हर्सिटीतील व्होल्कॅनोलॉजीचे प्राध्यापक टिम ड्रुट यांनी याबाबतची माहिती दिली. संशोधकांनी या ज्वालामुखीच्या आसपासचा सेस्मिक डाटा गोळा केला, जेणेकरून एक तपशीलवार नकाशा बनवता येऊ शकेल. या नकाशातून पाण्याखालील अतिशय मोठी सामग्री दिसून आली. समुद्रतळाशी ड्रिलिंग करून तिचे नमुनेही गोळा करण्यात आले. रिमोट-कंट्रोल्ड रोबोच्या साहाय्याने हे ड्रिलिंग झाले. त्यावरून हा ज्वालामुखी किती मोठा आहे, हे निष्पन्न झाले.
Latest Marathi News सात हजार वर्षांपूर्वी झाला होता सर्वात मोठा ज्वालामुखी उद्रेक Brought to You By : Bharat Live News Media.