अकरा आठवड्यांच्या बाळाच्या मेंदूसारखा कृत्रिम मेंदू
तेल अवीव : संशोधकांनी अनेक मानवी अवयवांसारखे कृत्रिम अवयवही प्रयोगशाळेत विकसित करण्यात यश मिळवलेले आहे. आता प्रथमच मानवी मध्यवर्ती चेतासंस्थेच्या सुरुवातीच्या टप्प्यांचे सूक्ष्म, थ्रीडी मॉडेलही बनवण्यात आले आहे. हे नवे मॉडेल म्हणजे ‘ऑर्गनॉईड’चाच एक प्रकार आहे. जिवंत ऊतींचा वापर करून हे सूक्ष्म, थ्रीडी मॉडेल बनवले आहे. ते अकरा आठवड्यांच्या एखाद्या भ्रुणाच्या मेंदूची नक्कल करणारे आहे. चाळीस दिवसांच्या काळात हा कृत्रिम मेंदू प्रयोगशाळेत विकसित करण्यात आला.
यापूर्वी संशोधनासाठी प्राण्यांच्या अवयवांचा वापर केला जात होता. मात्र, आता असे सूक्ष्म, कृत्रिम अवयव प्रयोगशाळेत बनवले जात आहेत ज्यांच्या सहाय्याने मानवी जीवशास्त्र अधिक अचूकतेने समजून घेता येईल. त्याचा उद्देश वेगवेगळ्या आजारांवरील औषधे शोधणे व त्यांचा विकास करणे हा आहे. केवळ लॅब डिशेस आणि उंदरांवरील संशोधनापेक्षा अशा संशोधनांमधून याबाबतची अचूकता अधिक येत असते. गेल्या काही वर्षांमध्ये असे अनेक अवयव प्रयोगशाळेत विकसित करण्यात आले.
त्यामध्ये सूक्ष्म अशा धडकणार्या हृदयापासून ते सूक्ष्म वृषणापर्यंतच्या अनेक अवयवांचा समावेश आहे. यापूर्वीही ब्रेन ऑर्गनॉईड्स बनवण्यात आलेले आहेत. मात्र, यावेळी प्रथमच भ्रुणीय मेंदूच्या सर्व तीन भागांची तसेच मणक्याची नक्कल प्रयोगशाळेत करण्यात आली. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘नेचर’ या नियतकालिकात देण्यात आली आहे. इस्रायलमधील विझमन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधील न्युरोकेमिस्ट्रीचे प्राध्यापक आणि या संशोधनाचे प्रमुख ओर्ली रेनर यांनी याबाबतची माहिती दिली.
हे मेंदूचे मॉडेल अगदी खर्या मेंदूप्रमाणेच कार्य करते, असे त्यांनी सांगितले. त्याचा विकास मानवातील प्लुरीपोटेंट स्टेम सेल्स म्हणजेच मूळपेशींचा वापर करून करण्यात आला. मूळपेशी या शरीरातील अशा पेशी असतात ज्यांचे रूपांतर शरीरातील कोणत्याही अवयवांच्या पेशींमध्ये करता येते.
Latest Marathi News अकरा आठवड्यांच्या बाळाच्या मेंदूसारखा कृत्रिम मेंदू Brought to You By : Bharat Live News Media.