तडका : रस्सीखेच आणि रणांगण
मजा आहे बाबा तुमची. येते 50 ते 60 दिवस राज्यात आणि देशात निवडणुकांची धामधूम असणार आहे. कोण कोणाशी लढणार? कोण किती जागा लढवणार? कुणाची कुणाबरोबर लढत होणार? कोण कोणाचा खेळ बिघडवणार? हे सर्व तुम्हाला दररोज पाहायला मिळणार आहे. राजकीय पक्ष सध्या जागावाटप प्रकरणामध्ये गुंतलेले आहेत. त्यामुळे त्यांना तर श्वास घ्यायलासुद्धा वेळ नाही. आपले स्वतःचे, कुटुंबीयांचे, कार्यकर्त्यांचे, पक्षाचे भवितव्य कसे असेल हे ठरवण्याची कसोटी राजकीय पक्षांपुढे आहे. युती, आघाडी यांच्या बैठकांवर बैठका दिवस-रात्र सुरू आहेत. कधीही टीव्ही सुरू केला किंवा पेपर उघडला तर पत्रकार परिषदेत कोण काय बोलले याविषयी घमासान सुरू आहे. विशेषत: सध्या असलेल्या केंद्र सरकारच्या विरुद्ध काय आखणी करता येईल याचा विचार करता करता विरोधी पक्षांचे डोके बधिर होऊन गेले आहे यात शंका नाही.
देशपातळीवरील आघाडी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यामध्ये फारसे यश आलेले दिसत नाही. हा सगळा गहजब आणि गदारोळ सुरू असतानाच पंतप्रधान मोदी देशाच्या विविध भागांमध्ये जाऊन ‘अब की बार चारसौ पार’, अशी गर्जना करतात आणि विरोधकांचे निवडणूक लढविण्याचे नीतिधैर्य खलास करून टाकतात हे आपण नेहमी पाहात आहोत. तुम्ही म्हणाल, यात आमची काय मजा? अहो मजाच मजा आहे.
पहिली गोष्ट म्हणजे जनतेचा भाग म्हणून तुमच्यावर सोयी-सवलतींची लयलूट केली जात आहे. विशेषत: महिला वर्गाला सवलती देण्यावर जास्त भर आहे. जेव्हापासून देशातील महिला या स्वतंत्रपणे मतदान करत आहेत, तेव्हापासून महिलांचे महत्त्व वाढत आहे. आता महिला या सजग, सावध आणि स्वकर्तृत्वावर उभ्या असल्यामुळे पतीने कुणालाही मतदान केले तरी आपण कोणाला मतदान करायचे हे तिने निश्चित ठरवलेले असते हे हेरूनच पंतप्रधान मोदींनी गेल्या दहा वर्षांत महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या आणि त्या राबवून दाखवल्या. काही राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये असे दिसून आले आहे की, महिला वर्ग हा फार मोठ्या प्रमाणावर स्वतंत्रपणे मतदान करत असतो आणि त्यांचा कल नरेंद्र मोदी यांना मतदान करण्याचा असतो.
लोकसभेला मतदान करताना राष्ट्रीय पातळीवरील प्रश्नांचा विचार केला जातो आणि तो करण्याइतका भारतीय मतदार सुज्ञ आहे हे आपल्याला दिसून आले आहे.
जागावाटप करताना रस्सीखेच हा शब्द वापरला जातो. याचे कारण म्हणजे जास्तीत जास्त जागा आपल्या पक्षाच्या पदरात पाडून घ्यायच्या, जेणेकरून आपले जास्तीत जास्त खासदार निवडून येतील आणि पुढील केंद्र सरकारमध्ये आपल्याला काहीतरी भूमिका घेता येईल, असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. यामध्य काही गफलत झाली तर भारतीय राजकारणामध्ये एक अद्भुत प्रकार आलेला आहे आणि तो म्हणजे मैत्रीपूर्ण लढत. मैत्रीपूर्ण लढत म्हणजे समजा, एखादी जागा आपल्याला मिळाली नाही तर त्या जागेवर आपल्या पक्षाचा उमेदवार उभा करून दोघांनी मिळून मैत्री करत करत समोरच्याला लढत देणे असा असावा. अशी सगळी गंमत जंमत येथे दोन महिने सुरू असणार असल्यामुळे तुम्हाला, आम्हाला म्हणजेच आपण जनतेला मनोरंजनाची काहीही कमतरता भासणार नाही हे निश्चित!
Latest Marathi News तडका : रस्सीखेच आणि रणांगण Brought to You By : Bharat Live News Media.