कोल्हापुरात शाहू महाराज विरुद्ध मंडलिक
कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे शाहू महाराज विरुद्ध शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक, तर हातकणंगले मतदारसंघातून शिवसेनेचेच विद्यमान खासदार धैर्यशील माने विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांची लढत निश्चित झाली आहे. शेट्टी स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार असून, महाविकास आघाडी तेथे आपला उमेदवार देणार नसल्याचे समजते. ही जागा महाविकास आघाडीअंतर्गत शिवसेना ठाकरे गटाच्या कोट्यात आहे. (Lok Sabha Election Kolhapur)
शाहू महाराज यांची उमेदवारी गेल्या महिन्यातच निश्चित करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांसह दोन्ही आमदार अजित पवार यांच्याबरोबर गेले. त्यामुळे व्ही. बी. पाटील यांच्याकडे जिल्ह्याचे अध्यक्षपद देऊन शरद पवार यांनी जिल्ह्याची सूत्रे हलविली. (Lok Sabha Election Kolhapur)
मूळ शिवसेनेतून निवडून आलेले संजय मंडलिक शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेल्याने महाविकास आघाडीकडून मातब्बर उमेदवाराचा शोध सुरू होता. शाहू महाराज यांच्या नावावर एकमत दाखवल्याने त्यांचेच नाव आघाडीवर राहिले आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्याला मान्यता दिली. आता शाहू महाराज काँग्रेसचे चिन्ह घेणार असल्याचे समजते. तथापि, याबाबत शाहू महाराज यांनी स्वत: कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही.
गेल्या काही दिवसांपासून राजू शेट्टी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली होती. या भेटीवर शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी टीका केली होती. तेव्हा शिवसेनेने जाधव यांना घरचा रस्ता दाखविला. तेव्हाच शेट्टी यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे मानले जात होते.
दरम्यान, राजू शेट्टी यांनी महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांपासून समान अंतर ठेवण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार शेट्टी स्वतंत्रपणे आखाड्यात उतरतील. तेथे महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना आपला उमेदवार देणार नाही, अशी चर्चा झाल्याचे खात्रीलायक सूत्रांनी साांगितले. त्यामुळे कोल्हापूरच्या आखाड्यातील लढती आता स्पष्ट झाल्या आहेत.
कोल्हापूरच्या बदल्यात शिवसेनेला हवी सांगलीची जागा
कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही मतदारसंघांतून शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे महाविकास आघाडीत जागावाटपाच्या चर्चेत या दोन्ही जागांवर शिवसेनेने हक्क सांगितला होता; मात्र शाहू महाराज यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे येताच शिवसेनेने त्याला होकार दिला. आता पक्ष निवडीचे स्वातंत्र्य शाहू महाराज यांचे आहे. कोल्हापूरच्या जागेवर दावा सोडल्याच्या बदल्यात शिवसेनेने सांगलीची जागा मागितली आहे.
Latest Marathi News कोल्हापुरात शाहू महाराज विरुद्ध मंडलिक Brought to You By : Bharat Live News Media.