शाहू महाराज सर्वांचे आदर्श; पण त्यांनी निवडणुकीस उभे राहू नये : पालकमंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : शाहू महाराज सर्वांचेच आदर्श आहेत. त्यांनी निवडणुकीत उभे राहू नये, असे आम्हाला वाटते; मात्र राजकारणात यावे की नको, हे त्यांनीच ठरवावे, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. (Hasan Mushrif)
महाविकास आघाडीकडून लोकसभेसाठी शाहू महाराज यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू आहे. आपल्याला उमेदवारीची ऑफर येण्याची शक्यता आहे, असे सांगत शाहू महाराज यांनीही निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर विचारले असता, मुश्रीफ म्हणाले, शाहू महाराजांनी राजकारणात यावे की नको, हा त्यांचा प्रश्न आहे. ते सर्वांचे आदर्शस्थान आहेत, ते तसेच कायम राहावे, यामुळे त्यांनी निवडणुकीत उभे राहू नये, असे आम्हाला वाटते. (Hasan Mushrif)
यापूर्वीही मंडलिक आणि राजघराणे अशी लढत झाली होती, त्यावेळीही त्या लढतीचा केंद्रबिंदू शरद पवार होते. आजही तशीच परिस्थिती निर्माण होत आहे, याबाबत विचारले असता मुश्रीफ म्हणाले, कोणाला निवडून द्यायचे, हे लोकशाहीत लोकांनी ठरवावे. जागावाटपाबाबत तिन्ही पक्षांचे नेते एकत्रित बसून निर्णय घेतील. जिल्ह्यातील दोन्ही जागा शिवसेनेकडेच राहतील, अशी शक्यता आहे. कारण, सरकार स्थापनेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तसे सांगण्यात आले होते. जिल्ह्यातील दोन्ही जागा आम्हाला निवडून आणाव्या लागतील.
इचलकरंजी पाणीप्रश्नाबाबत गुरुवारी बैठक
इचलकरंजी शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी देणे ही पालकमंत्री म्हणून आपली जबाबदारी आहे. त्यासाठी प्रयत्न करू, असे सांगत गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत या सर्व प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा होईल, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.
शहरातील रस्त्यांसाठी 100 कोटी मंजूर
शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलन करत रस्ते नसतील तर हाडांचे दवाखाने तरी सुरू करा, अशी मागणी केली होती. त्यावर बोलताना, शहरातील रस्त्यांसाठी 100 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. आणखी निधीचा प्रस्ताव आहे. यामुळे आता हाडांचे दवाखाने कशासाठी? थोड्याच दिवसांत रस्त्याची कामे सुरू होतील. शहरातील रस्ते एकदम गुळगुळीत दिसतील, असेही मुश्रीफ यांनी सांगितले. कोल्हापुरी चपला आता क्यूआर कोडसह असतीलय त्यामुळे चपलांच्या बनावट निर्मितीला आळा बसेल आणि अस्सल कोल्हापुरी चपलांची देश आणि जगभरात निर्यात होईल, असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
Latest Marathi News शाहू महाराज सर्वांचे आदर्श; पण त्यांनी निवडणुकीस उभे राहू नये : पालकमंत्री हसन मुश्रीफ Brought to You By : Bharat Live News Media.