नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : राजधानी दिल्लीत गेले ४ दिवस सुरू असलेल्या भारत टेक्स २०२४ या वस्त्रोद्योग महोत्सवाचा आज समारोप झाला. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भारत टेक्स २०२४ च्या महाराष्ट्र दालनात एकूण २८ स्टॉल्स उभारण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष लक्षात घेवून महाराष्ट्र दालनाची थीम तयार करण्यात आली होती. यामध्ये विविध शासकीय संस्थांसह खाजगी संस्थाही सहभागी झाल्या होत्या. हा महोत्सव लक्षवेधी आणि अभ्यागतांसाठी आकर्षक ठरेल, अशी सजावट करण्यात आली होती. या महोत्सवात महाराष्ट्र राज्यासह सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सहभागी झाले होते.
या महोत्सवात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे वस्त्रोद्योगातून पर्यटन, खादी ग्रामोद्योग मंडळाचे टाकाऊपासून टीकाऊ साहित्य निर्मिती प्रकल्प (डायरी, कार्यालय फाईल, पिशवी, पेन, शो पीस इत्यादी), तसेच महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळांतर्गत मधमाशी पालन व्यवसाय, महिला आर्थिक विकास महामंडळाचे शोभेच्या वस्तु, हातमाग महामंडळ आणि यंत्रमाग महामंडळाद्वारे सोलापूरच्या चादरी, टॉवेल तसेच बांबुपासून बनवलेले टॉवेल, नॅपकिन, वस्त्रे लक्षवेधी होती. खादी ग्रामोद्योग मंडळाकडून मधमाशी पालनासंदर्भात आणि टाकाऊ कागदापासून टिकाऊ वस्तू तयार करण्याची माहिती देणारे स्टॉल लक्षवेधी होते. तसेच या महोत्सवात राज्याची पारंपारिक पैठणी, खण, हिमरू, गोंगडी, सोलापूर चादर, पुणेरी पगडी, टस्सर रेशीम, मलबेरी रेशीम, हातमाग साड्या, टोप्या, टेरी टॉवेल, कोल्हापूरी चप्पल, पैठणीच्या बॅग यासह माविम कडूनही स्टॉल्स उभारण्यात आले होते.
या महोत्सवाच्या माध्यमातून राज्यातील उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होते. ग्राहकांसह व्यापाऱ्यांच्या अपेक्षा कळतात त्यामुळे केवळ व्यवसाय वाढवण्यासाठी नव्हे तर नव्या गोष्टी, तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी या गोष्टींचा फायदा होत असल्याचे विविध स्टाल्सधारकांनी सांगितले. विशेष म्हणजे वस्त्रोद्योग महोत्सवात ज्ञानाधारित सत्रे, परिसंवाद आणि संमेलने, जागतिक स्तरावर कापड उद्योगाला पुन्हा एकदा परिभाषित करणाऱ्या उपक्रमांचा समावेश होता.
महोत्सवादरम्यान महाराष्ट्राच्या दालनाचे उद्घाटन वस्त्रोद्योग विभागाचे सचिव विरेंद्र सिंग, राज्यातील खादी व ग्रामोद्योग बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीमती आर. विमला, महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी, अजय भंडारी व महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक श्रीमती फरोग मुकादम उपस्थित होत्या. या महोत्सवात ४० देशांमधील प्रदर्शक आणि ग्राहक सहभागी झाले होते. तसेच यामध्ये ४० देशांतील एक हजारहून अधिक प्रदर्शक आणि तीस हजारपेक्षा अधिक कारागीर आणि उद्योजकही सहभागी झाले होते.
Latest Marathi News ‘भारत टेक्स’ या वस्त्रोद्योग महोत्सवाचा समारोप Brought to You By : Bharat Live News Media.