सोलापूर : शहरातील मिळकत थकबाकीदारांवर कारवाईचे आदेश; महापालिका उपायुक्त आशिष लोकरे
सोलापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : महापालिका मालमत्ता कर विभागातील सर्व कर निरीक्षक व वसुली लिपिक यांना दिलेल्या उद्दिष्टानुसार वसुली पूर्ण करण्यासाठी कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली सर्व पेठांचे संयुक्त वसुली पथक तयार करण्यात आले आहेत. या अंतर्गत प्रत्येक पथकात ३ कर निरीक्षक या प्रमाणे एकूण आठ पथके तैनात करण्यात आली आहेत. तसे कार्यालयीन आदेश उपायुक्त आशिष लोकरे यांनी काढले आहेत.
मालमत्ता कराच्या थकबाकीदारांवर कारवाई आणि वसुली मोहिमेला शुक्रवार दि. १ मार्चपासून सुरुवात होणार आहे. थकबाकी न भरणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात येणार असून यासाठी कर निरीक्षकांची आठ पथके तैनात करण्यात आली. प्रत्येक झोनमध्ये वसुली बरोबरच कारवाई करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या मालमत्ता कराची अद्यापही चारशे कोटीहून अधिकची थकबाकी आहे. मार्च अखेरपर्यंत यामधील शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट विभागाला देण्यात आले आहे. यानुसार महापालिका मालमत्ता कर विभागाचे प्रमुख उपायुक्त आशिष लोकरे यांनी गुरुवारी कार्यालयीन आदेश काढत वसुली मोहीम आणि कारवाईसाठी मालमत्ता कर विभागातील करनिरीक्षकांची पथके तयार केली आहेत.
मालमत्ता कर विभागातील सर्व कर निरीक्षक व वसुली लिपिक यांना दिलेल्या उद्दिष्टानुसार ते कामाला लागतील. प्रभारी सहाय्यक मूल्य निर्धारक व कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली शहरातील सर्व पेठांचे संयुक्त वसुली पथक तयार करण्यात आले आहे. याचबरोबर या पथकांवर सह नियंत्रण अधिकारी म्हणून प्रदीप करणकोट आणि सूर्यकांत खसगे हे असणार आहेत. यांना पेठवाईज वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
या पथकाने उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत वसुलीची कार्यवाही सुरूच ठेवावी आणि जे मिळकतदार मिळकतकर भरण्यास असमर्थता दाखवतील अशा मिळकतदारांवर कारवाई करण्यात यावी आणि त्याचा अहवाल प्रशासनाकडे पाठवावा असे आदेश उपायुक्त लोकरे यांनी जारी केले आहेत.
ही आहेत आठ पथके
पथक क्रमांक १ मध्ये कर निरीक्षक एन. जी. कोकणे, एम. यु. चांदोडे, शकील कोरबू, पथक-२ मध्ये कर निरीक्षक मनोज धेडे, अमोल पवार, विजयकुमार करली, पथक-३ मध्ये कर निरीक्षक जे. आर. फुटाणे, चन्नप्पा म्हेत्रे, आर. एस. बिद्री, अरविंद डोमल, पथक-४ मध्ये कर निरीक्षक एस. डी. रावडे, डी. एम. देशमुख, पथक- ५ मध्ये कर निरीक्षक बी.बी. नरोटे अंजनय्या म्हेत्रे, पथक- ६ मध्ये कर निरीक्षक एस. एम. अंबुरे, रमेश जाध,व सुभाष गवळी, पथक- ७ मध्ये कर निरीक्षक जी. के. स्वामी, संजीव फुले, शकील कोरबू, पथक- ८ मध्ये कर निरीक्षक एस. बी. जगताप, इरशाद मुजावर आणि सुभाष सुरवसे असे कर निरीक्षक आणि कर्मचारी असणार आहेत.
Latest Marathi News सोलापूर : शहरातील मिळकत थकबाकीदारांवर कारवाईचे आदेश; महापालिका उपायुक्त आशिष लोकरे Brought to You By : Bharat Live News Media.