हिंगोलीची जागा ठाकरे गटाकडे जाणार ?
हिंगोली; Bharat Live News Media वृत्तसेवा : महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फार्म्युला ठरल्याचे जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. हिंगोली लोकसभेची जागा ठाकरे गटाला सोडण्यात आल्याची चर्चाही सुरू झाल्याने ठाकरे गटाकडून इच्छुक असणार्या उमेदवारांचे हौसले बुलंद झाले आहेत. मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. परंतू आता हळुहळू जागा वाटपाच्या दिशेने चर्चा सुरू झाल्याने ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना हायसे वाटू लागले आहे. (Lok Sabha Election 2024)
हिंगोली लोकसभा मतदार संघावर कायम शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. सध्या शिंदे गटात गेलेले विद्यमान खासदार हेमंत पाटील हे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून विजयी झाले होते. परंतू शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीनंतर खासदार पाटील यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुक लढविली जाणार असल्याने हिंगोली लोकसभा मतदार संघावर ठाकरे गटाबरोबरच काँग्रेस, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दावा सांगितल्याने तिढा निर्माण झाला आहे. काही दिवसांपुर्वी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर हेच महाविकास आघाडीचे उमेदवार राहील अशी चर्चा सुरू झाली असतानाच बुधवारपासून मात्र हिंगोली लोकसभा मतदार संघ ठाकरे गटाकडेच राहणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या ठाकरे गटाकडून हदगावचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, माजी सभापती रूपाली पाटील गोरेगावकर, जिल्हा संघटक बाळासाहेब मगर हे इच्छुक आहेत. शिवसेनेकडून स्थानिक उमेदवार द्यावा असा सूरही उमटत असल्याने नागेश पाटील आष्टीकर यांच्या ऐवजी डॉ. मुंदडा, गोरेगावकर, मगर यांच्या नावावर एकमत होऊ शकते तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत आल्यास ठाकरे गटातून नुकतेच वंचित बहुजन आघाडीत प्रवेशकर्ते झालेले डॉ.बी.डी. चव्हाण यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाच्या वाटाघाटीत वंचितला हिंगोली लोकसभा मतदार संघ सोडला जाईल असा दावा वंचितच्या कार्यकर्त्यांकडून केला जात असल्याने डॉ. चव्हाण यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे.
भाजपमधील विसंवाद उघड
हिंगोली लोकसभा मतदार संघ भाजपच्या वाट्याला सोडवून घेण्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकारी कामाला लागले आहेत. गुरूवारी शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले. या शिष्टमंडळात आमदार तान्हाजी मुटकुळे, रामदास पाटील सुमठाणकर, जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, माजी खासदार शिवाजी माने यांचा समावेश असल्याचे सुत्रांनी सांगितले तर दुसरीकडे माजी आमदार वडकुते यांना विचारणा केली असता मला याबाबत कल्पना नसल्याचे सांगितले तर माजी आमदार गजानन घुगे हे हिंगोलीतच थांबल्याचे सांगण्यात आल्याने भाजपमधील विसंवाद उघड झाला आहे. विशेष म्हणजे भाजपकडूनही स्थानिक उमेदवार द्यावा असा सूर उमटू लागला आहे. हिंगोली लोकसभेत कायम बाहेरचा उमेदवार लादल्या जात असल्याने विकास खुंटल्याचे बोलले जात आहे. एकंदरीत भाजपमध्येही उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असून सुप्त संघर्षही असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा
आगामी लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे चिन्ह ‘मशाल’च?
अमरावती : अस्थि विसर्जन करून परत येणाऱ्या पिकअप वाहनाचा शेंदुर्जना घाट पुलावर अपघात, १४ जण गंभीर
खा. श्रीकांत शिंदेंविरोधात लढणार महाविकास आघाडीकडून महिला उमेदवार ?
Latest Marathi News हिंगोलीची जागा ठाकरे गटाकडे जाणार ? Brought to You By : Bharat Live News Media.