‘भामा आसखेड’ मधून उन्हाळी आवर्तन : चार तालुक्यांना फायदा
भामा आसखेड : Bharat Live News Media वृत्तसेवा : खेड, शिरूर, दौंड, हवेली या चार तालुक्यांसाठी भामा आसखेड धरणातून बुधवारी
(दि. 28) सकाळी 10 वाजता पहिले उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे. या आवर्तनाचा फायदा भामा व भीमा या नद्यांवरील गावांना होणार आहे. दोन्ही नद्यांवरील एकूण 18 बंधारे भरण्यात येणार आहेत. या पाण्याचा फायदा उन्हाळी पिकांसह पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांना होणार आहे. भामा आसखेड धरणातून सोडण्यात आलेले हे कालवा समितीच्या नियोजनातील पहिले उन्हाळी आवर्तन आहे. भामा आसखेड धरण उपविभागाचे सहायक अभियंता अश्विन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी, सकाळी 10 वाजता धरणातून 1200 क्यूसेक प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. दौंड तालुक्यातील भीमा नदीवरील आलेगाव पागा येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा भरल्यानंतर हे आवर्तन बंद केले जाणार आहे.
नदीकाठच्या शेतकर्यांनी सावधानता बाळगावी, अशी सूचना धरण प्रशासनाने केली आहे. या आवर्तनामुळे भामा व भीमा नदीलगतच्या गावांतील शेतकर्यांना शेतीपिकांना, तसेच गावोगावच्या पाणी उपसा सिंचन योजनांना फायदा होणार आहे. पाणी सोडल्याने चारही तालुक्यांतील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. 8.14 टीएमसी पाणीसाठवण क्षमता असलेल्या भामा आसखेड धरणात सध्या 5.69 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. एकूण पाणीसाठा 161.034 दलघमी असून, उपयुक्त पाणीसाठा 147.512 दलघमी आहे. तर, पाण्याची टक्केवारी 67.95 इतकी आहे, अशी माहिती धरण विभागाचे शाखा अभियंता नीलेश घारे यांनी दिली.
हेही वाचा
केंजळ येथे महावितरणचे उपकेंद्र उभे राहणार; आंदोलनाला यश
नाशिकला साकारणार राज्यस्तरीय हाय परफाॅर्मन्स सेंटर
आरक्षण मर्यादा वाढीसाठी राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करावा : जरांगे-पाटील
Latest Marathi News ‘भामा आसखेड’ मधून उन्हाळी आवर्तन : चार तालुक्यांना फायदा Brought to You By : Bharat Live News Media.