वनसंवर्धनाचा वसा घेतलेला एक ‘अवलिया’, ज्याने ओसाड पाड्याचेही केले नंदनवन

जंगल, जल, जमीन, जन आणि जनावर या पंचसूत्रीचा वापर करून वनसंवर्धनासाठी देशात जनजागृती आणि प्रत्यक्ष कृती केल्याबद्दल राज्य शासनाने धुळे जिल्ह्यातील बारीपाडा येथील चैत्राम पवार यांना राज्यातील पहिला वन भूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. वृक्षांचे संवर्धन झाल्याशिवाय जनतेचे भले होणार नाही, मागच्या 50 वर्षात वृक्षतोडी संदर्भात काय झाले, याचा विचार करून गप्प बसल्यापेक्षा … The post वनसंवर्धनाचा वसा घेतलेला एक ‘अवलिया’, ज्याने ओसाड पाड्याचेही केले नंदनवन appeared first on पुढारी.
वनसंवर्धनाचा वसा घेतलेला एक ‘अवलिया’, ज्याने ओसाड पाड्याचेही केले नंदनवन

धुळे ; यशवंत हरणे

जंगल, जल, जमीन, जन आणि जनावर या पंचसूत्रीचा वापर करून वनसंवर्धनासाठी देशात जनजागृती आणि प्रत्यक्ष कृती केल्याबद्दल राज्य शासनाने धुळे जिल्ह्यातील बारीपाडा येथील चैत्राम पवार यांना राज्यातील पहिला वन भूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. वृक्षांचे संवर्धन झाल्याशिवाय जनतेचे भले होणार नाही, मागच्या 50 वर्षात वृक्षतोडी संदर्भात काय झाले, याचा विचार करून गप्प बसल्यापेक्षा भविष्यातील पिढीला वनांच्या माध्यमातून समृद्धता मिळवून देण्यासाठी परिश्रम करण्याचे धोरण राबवण्याचा पवार यांचा प्रत्येकाला आग्रह आहे. हे ओळखूनच वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून पवार यांनी विद्यार्थ्यांपासून आदिवासींपर्यंत ही जनजागृतीची मोहीम सुरू केली. त्याचा अपेक्षित परिणामही दिसतो आहे. त्यांनी बारीपाडा गावात केलेल्या या जल आणि जंगल क्रांतीमुळेच आज बारीपाड्याचे नाव जगभरामध्ये यासाठी आदराने घेतले जाते आहे. (Vanbhushan Chaitram Pawar)
धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातील बारीपाडा गाव हे 1990 च्या पूर्वी दुर्गम खेडे म्हणून ओळखले जात होते. या गावाची अवस्था त्यावेळी मोठी बिकट होती. बारीपाडा हे गाव धुळे जिल्हा ठिकाणापासून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे. गावाने स्वतःची पर्यटनकेंद्र म्हणून ओळख बनवली आहे. स्थानिक कार्यकर्ता चैत्राम पवार यांनी गावाचा कायापालट पूर्णत: केला आहे.
गावाची परिस्थिती 1992 सालापूर्वी बिकट होती. पावसाळी शेती फक्त पोटापुरती होती. गावातील लोकांना पाणी आणण्यासाठी चार मैलांवर जावे लागत होते. पावसाळा संपल्यानंतर गावात उपजीविकेचे कोणतेही साधन नसल्यामुळे या गावातील नागरिकांना मजुरीसाठी आजुबाजूच्या गावात जावे लागत होते. गावात कुपोषणाचे प्रमाण मोठे होते. अर्धे गाव दारिद्र्यरेषेखाली होते. शिक्षणासाठी गावाबाहेर गेलेला युवक पुन्हा गावात स्थिरावलाच नाही. गावची शेतीही फारशी विकसित नव्हती. रोजगार नसल्यामुळे व्यसनाधीनता वाढलेली होती. अशा परिस्थितीत चैत्राम पवार बारीपाडा शेजारी असलेल्या वार्सा गावातील वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यात सहभागी झाले. या ठिकाणी त्यांच्या विचार आणि प्रयत्नांना चालना मिळाली.
पाच ‘ज’ च्या पंचसूत्रीवर सुरु केलं काम (Vanbhushan Chaitram Pawar)
चैत्राम पवार यांनी गावातील सहकाऱ्यांना सोबत घेऊन पाच ‘ज’च्या व्यवस्थापन नियोजनानुसार कामाला सुरुवात केली. पाच ‘ज’ म्हणजे जल, जमीन, जंगल, जनावर, जन, या पंचसूत्रीवर त्यांनी काम सुरू केले. गावात वृक्षतोड प्रचंड प्रमाणात होती. परिणामी जंगल नाहीसे होत होते. त्यांनी ती वृक्षतोड थांबवावी, यासाठी गावातील सात पुरुष आणि सहा महिला यांना संघटित करून अकरा सदस्यांची ‘वनसंरक्षण समिती’ 1993 साली बनवली. या वनसंरक्षण समितीने एक नियमावलीच तयार केली. त्यात कुऱ्हाडबंदी, चराईबंदी केली. वृक्षतोड करणाऱ्यास १०५१ रुपये दंड, लाकडी वाहतूक करणाऱ्यास ७५१ रुपये दंड, लाकूडचोरीची खबर देणाऱ्यास १५१ रुपये बक्षीस असे नियम बनवले. या नियमांवर प्रत्येक गावकऱ्यांनी अंमलबजावणी करावी यासाठी त्यांनी जनजागृती बरोबरच प्रत्यक्ष कृती देखील सुरू केली. वनरक्षणासाठी माणूस नेमणे गरजेचे आहे. म्हणून समितीच्या आणि गावकऱ्यांच्या संगनमताने गावातील दोन व्यक्ती त्या वनांचे संरक्षण करतील, असे मान्य केले गेले. गावातील प्रतिपरिवार तीन रुपये शुल्क वनसंरक्षणासाठी म्हणून देण्याचे ठरले. एकूण जमा झालेले शुल्क वनसंरक्षणासाठी नियुक्त केलेल्या त्या दोन व्यक्तींना वेतन म्हणून देण्याचे ठरवले गेले.
अन् बारीपाड्यात तयार झालं जंगल
जंगलामधून चोरलेल्या लाकडांचा लिलाव करुन लिलावात जमा झालेला पैसा वनसंरक्षण समितीकडे जमा करण्यास सुरुवात झाली. जमा झालेला पैसा गावाच्या विकासासाठी वापरला जाऊ लागला. याबरोबरच गावकऱ्यांच्या मदतीने वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेण्यात आला. वनविभागाच्या खात्यात असलेल्या बंजर जमिनीचे जंगलात रूपांतर करण्याचा उपक्रम सुरू केला गेला. त्यात त्यांनी एक लाख रोपांची लागवड केली. तीनशेचाळीस प्रकारची विविध रोपे लावली गेली. त्या रोपांचे आज वृक्षात रूपांतर झाले असून बारीपाड्यातील परिसरामध्ये आता जंगल तयार झाले आहे.
वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून चैत्राम पवार यांनी सुरू केलेल्या हा विकासाचा रथ केवळ जंगल ,जल आणि जमीन या पुरताच मर्यादित न राहता आदिवासींचे लोक जीवन सुधारण्यासाठी देखील यातून मोठा प्रयत्न केला गेला. त्याचे अपेक्षित यश देखील आज जगभरात बारीपाड्याचे नाव पोचल्याने दिसते आहे.
शेतीतील ‘त्या’ प्रयोगाने मिळाली उर्जा
गावकऱ्यांनी गव्हाच्या शेतीविषयी पहिला प्रयोग 1994 साली केला. या यशस्वी प्रयोगामुळे चैत्राम पवार यांना आणि गावकऱ्यांना काम करण्यास ऊर्जा मिळाली. गावकरी शेतीचे वेगवेगळे प्रयोग पाहण्यासाठी दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ लागले. स्वतःच्या गावात तेथील प्रयोग राबवण्याचा प्रयत्न केला गेला. गावकऱ्यांनी चारसूत्री भात लागवडीचे प्रयोग यशस्वी केले. बटाटा, कांदा लागवडीची प्रायोगिक सुरुवात करण्यात आली होती. तो प्रकल्पसुद्धा यशस्वी झाला. तेथे ज्वारी, बाजरी, वरई, भादला, कुळीथ, तूर, भुईमूग, हरभरा ही पिके घेतली जातात. सध्या तेथील गावकरी इंद्रायणी तांदूळ, फळबाग, हिरव्या पालेभाज्या, गुलाब, स्ट्रॉबेरीची शेती करत आहेत. त्यासोबतच चौदाशे कलमी आंब्यांची लागवडही तेथे केली गेली आहे.
चैत्राम पवार विचारतात, ऑक्सिजनची फॅक्टरी कुठे आहे?
वनवासी कल्याण आश्रमाचे कार्य देशभरामधील वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुरू आहे. चैत्राम पवार यांनी देखील बारीपाडा येथे यशस्वी केलेला हा प्रयोग आता या आश्रमातील मार्गदर्शकांच्या सोबत राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी राबवण्यास सुरुवात केली. याबद्दल माहिती देताना त्यांनी जंगलाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. बारीपाडा मध्ये पर्यावरण रक्षणाचे काम सुरू केले. सरकारची मदत आणि जनतेचे संघटित प्रयत्न या माध्यमातून क्रांती होऊ शकते, असे ते म्हणतात. आता वनसंवर्धनासाठी राज्यात काम करतो आहे. सामुदायिक वन अधिकार, जॉईंट फॉरेस्ट या माध्यमातून हे काम सुरू आहे. आदिवासी भागात शिल्लक असलेले जंगल लोकांनी सांभाळावे ,यासाठी जनजागृती करतो आहे. जंगल, जल, शेती हे आज समाज जीवनासाठी वास्तव आहे. आज प्रत्येकाला जंगल ही सरकारचीच मालमत्ता आहे असे वाटते. त्यामुळे सामुदायिक आणि सरकारी संपत्तीची अपेक्षित काळजी जनतेकडून घेतली जात नाही. ही राष्ट्रीय संपत्ती असून या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी गावातील प्रत्येकाने तसेच सामाजिक संघटनांनी पुढे आले पाहिजे. शिल्लक असलेले वन वाचवण्यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न आवश्यक आहे. सरकारने वन वाचवण्यासाठी वनविभागाची निर्मिती केली आहे. मात्र वनविभागाला देखील जनतेच्या मदतीची गरज आहे. जंगल, जल, जमीन, जनावर आणि जन ही पंचसूत्री प्रत्येकासाठीच महत्त्वाची आहे. त्यामुळेच वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून देशभरात या पंचसूत्री वर काम केले जाते आहे. देशभरातील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये वनांच्या सुरक्षेसाठी त्यांना प्रोत्साहित केले जाते आहे. वनरक्षणाचे महत्त्व त्यांना पटवून सांगितले जात आहेत. देशातील झारखंड, छत्तीसगड तसेच राजस्थान गुजरात अशा जंगलतोड झालेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरू आहे. आपण भूतकाळात 50 वर्षांपूर्वीची अवस्था पाहिली असता त्यावेळेस समृद्ध असलेले जंगल आपणच नष्ट केल्याचे दिसते. आज जंगल नष्ट केले तर ऑक्सिजनची फॅक्टरी कुठे आहे, ऑक्सिजन कुठून मिळेल, हा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. वृक्ष कमी झाले तर त्याचा परिणाम पाण्यावर होईल. शेतीची माती वाहून जाईल. यातून पर्यावरणाचा मोठा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे आपली पुढची पिढी सुरक्षित आणि समृद्ध होण्यासाठी आजच प्रत्येकाला या पंचसूत्री वर काम करावे लागणार आहे, असे ते अधोरेखित करतात. (Vanbhushan Chaitram Pawar)
आपण आपल्या जिल्ह्यासाठी काय करू शकतो. हा विचार प्रथम केला गेला पाहिजे. जिल्ह्यात पूर्वी जंगल होते. पण जंगल आदिवासींनी तोडल्याचा आरोप केला जातो. पण या भागात फिरले असता आदिवासींच्या मोठ्या इमारती कोठेच दिसत नाहीत. आदिवासी आज देखील झोपडीत राहतो. याचा विचार करून वनसंवर्धनासाठी प्रत्येकाने हातभार लावण्याची काळाची गरज ओळखली पाहिजे. यासाठीच वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून देशभरामध्ये जंगल, जल, जमीन, जन आणि जनावर या पंचसूत्रीच्या संवर्धनासाठी काम करतो आहे. तसेच इतरांना देखील या उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याची जनजागृती करणे सुरू आहे. हे राष्ट्रीय काम कोणा एकट्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे नसून यासाठी सांघिक प्रयत्न महत्त्वाचे आहे. या उपक्रमात यापुढे आपण प्रत्येकाने सहभागी होऊन आपली भावी पिढी समृद्ध करूया असे आवाहन देखील त्यांनी केले.
हेही वाचा :

Dhule News : बारीपाडा येथील चैत्राम पवार यांना पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जाहीर
Himachal Political Crisis : हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसचे ६ बंडखोर आमदार अपात्र
चुकीच्या करामुळे 34 गावांत जनआक्रोश; कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा

Latest Marathi News वनसंवर्धनाचा वसा घेतलेला एक ‘अवलिया’, ज्याने ओसाड पाड्याचेही केले नंदनवन Brought to You By : Bharat Live News Media.