अनधिकृत फळभाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण : थाटले बेकायदा व्यवसाय
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : उपनगरातून मुख्य शहराकडे येणार्या लहान- मोठ्या रस्त्यांना अनधिकृत फळभाज्या विक्रेत्यांनी विळखा घातला आहे. पदपथावर अतिक्रमण केलेलेच आहे; पदपथ सोडून मुख्य रस्त्यावर बसून चक्क विक्रीचे टेम्पो उभे करून व्यवसाय करणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, याकडे महापालिका प्रशासन सोयीस्करपणे कानाडोळा करत आहे. शहरातील फेरीवाल्यांना आणि पथारी व्यावसायिकांना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून वार्षिक शुल्क घेऊन फेरीवाला प्रमाणपत्र दिले जाते. मात्र, शहरातील लहान- मोठ्या रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात अनधिकृत व्यावसायिकांनी अतिक्रमणे थाटली आहेत. पदपथ असतानाही फळे व विविध वस्तू विक्री करणारे टेम्पो रस्त्याच्या कडेला उभे केले जातात. यामुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होऊन वाहतूक कोंडी होते.
उपनगरांतील बहुसंख्य रस्त्यांच्या कडेला व पदपथांवर अनधिकृतपणे फळे व भाज्यांची व इतर साहित्यांची विक्री करणार्यांची संख्या वाढत आहे. शहराच्या आसपासच्या गावांमधून भाजीपाला व फळे घेऊन येणारे टेम्पो मुख्य रस्त्याच्या बाजूलाच उभे राहून व्यवसाय करतात. अशा व्यावसायिकांकडे खरेदी करण्यासाठी वाहनचालक व दुचाकीस्वार रस्त्यालाच गाडी उभी करून खरेदी करतात.
शहर व उपनगरांमधील रस्त्यांवर ही परिस्थिती असताना कारवाई करण्याची जबाबदारी असणारा महापालिकेचा अतिक्रण विभाग याकडे सोईस्कर डोळेझाक करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.
इथे असतात रस्त्यावर विक्रेते
स्वारगेट – कात्रज रस्त्यावर भारती विद्यापीठसमोर
सोलापूर रस्त्यावर शेवाळेवाडी ते मांजरी फाटा, रेस कोर्स परिसर
नगर रस्त्यावर वाघोलीपासून येरवड्यापर्यंत जागोजागी वस्तू व फळेविक्रेते असतात.
जुना पुणे-मुंबई रस्त्यावर रुंदीकरणाचे काम सुरू आहे, असे असतानाही खडकीपासून वाकडेवाडीपर्यंत विक्रेते रस्त्याच्या कडेला व्यवसाय करतात.
कोंढव्यापासून लष्कर रुग्णालयापर्यंत विविध प्रकारचे विक्रेते थांबतात.
उत्तमनगरपासून वारजेपर्यंत फळे, भाज्या व इतर वस्तूंचे विक्रेते बसतात.
किरकटवाडी ते धायरी फाटा यादरम्यान रस्त्याच्या कडेला.
व्यावसायिक -प्रशासनाची मिलीभगत?
अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेचे टेम्पो फिरतात. दुसरीकडे टेम्पोच्या पुढे दुचाकीवर जाणारा व्यक्ती कारवाईचा टेम्पो येत आहे, असे सांगत व्यावसायिकांना सतर्क करतो. अशाच प्रकारे एखादा वरिष्ठ अधिकारी पाहणी करण्यास येणार आहे, थांबू नका, असेही निरोप व्यावसायिकांना दिले जातात, यावरून व्यावसायिक व प्रशासनातील लोक यांची मिलीभगत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पानमळा ते वडगाव विक्रेते हद्दपार
सिंहगड रस्त्यावरील पानमळा ते वडगाव ब्रिज यादरम्यान पदपथ सोडून मुख्य रस्त्यावर फळे व भाज्या विक्रेत्यांसह इतर वस्तू विक्रेते बसत होते. या रस्त्यावर राजाराम पूल ते पण टाईम थिएटर यादरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू असतानाही विक्रेते रस्त्यावर अतिक्रमण करत होते. टेम्पो थांबवून व्यवसाय करत होते. यासंदर्भात दैनिक Bharat Live News Mediaने वारंवार वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने या रस्त्यावर रात्री उशिरापर्यंत गस्तीचे पथक तैनात केले. यामुळे गेल्या पंधरा दिवसांत या रस्त्यावरील अतिक्रमण व विक्रेते हद्दपार झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
हेही वाचा
नाशिक | खासदार हेमंत गोडसेंची घरवापसी?
मनोज जरांगेंनी लोकसभेची निवडणूक लढवली तर स्वाभिमानीचा पाठींबा
उरुळी-फुरसुंगीवर पुन्हा घोंघावणार कचर्याचे संकट !
Latest Marathi News अनधिकृत फळभाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण : थाटले बेकायदा व्यवसाय Brought to You By : Bharat Live News Media.