‘आदर्श’ शाळा सहा वर्षे शिक्षकांपासून वंचित!
काष्टी : Bharat Live News Media वृत्तसेवा : श्रीगोंदे तालुक्यातील भीमा नदीकाठावरील कौठा (गवळवाडी) येथील आदर्श पुरस्कारप्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला गेल्या सहा वर्षांपासून शिक्षक नसल्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. श्रीगोंदे पंचायत समितीमध्ये सहा वर्षांत मुलासह आंदोलन केले; परंतु कोणीही आमची गांभीर्याने दखल घेतली नसल्यामुळे आता दि. 7 मार्च रोजी विद्यार्थ्यांसह जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या दालनात ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी सरपंच हनुमंतराव गवळी, रामदास गवळी यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी : तालुक्यातील कौठा (गवळवाडी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही तालुक्यात दुसरी, तर जिल्ह्यात पाचव्या क्रमांकाची आदर्श शाळा आहे. येथे पहिली ते चौथीपर्यंत वर्ग भरतात. पण या शाळेतील विद्यार्थ्यांना दि. 16 मार्च 2018पासून ज्ञानदानासाठी शिक्षक नाही. युवराज निवृत्ती उघडे या शिक्षकाची येथे नियुक्ती आहे. परंतु सहा वर्षांपासून हा शिक्षक एकदाही शाळेत मुलांना शिकवायला आला नाही.
कारण हाच शिक्षक दररोज मद्य पिऊन जुगार खेळत असतो; पण शाळेत येत नाही. याबाबत पंचायत समिती येथे लेखी तक्रार करून विद्यार्थ्यांना घेऊन पंचायत समिती दालनात आंदोलन केले. पण येथील अधिकारी संबंधित शिक्षकावर मेहेरबान असल्याचे दिसून आले. अजून तो शिक्षक वरिष्ठ अधिकार्यांनी निलंबित केला नाही. त्या शिक्षकावर कोणाचा वरदहस्त आहे, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
गवळवाडी गावची लोकसंख्या 700 आहे. येथील शाळेतील मुलांची पटसंख्या 40 होती. परंतु शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या कमालीची घटली आहे.
सोमवारी (दि. 26) गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकार्यांना दालनात कोंडून ठेवले तेव्हा त्यांनी, उद्याच तुम्हाला शिक्षक देतो, असे लेखी आश्वासन दिले. मंगळवारी (दि. 27) अधिकार्यांनी शिक्षक देण्याऐवजी पंचायत समितीचा शिपाई शाळेत पाठवून आमची चेष्टा केली. याच्या निषेधार्थ, तसेच अधिकार्यांना धडा शिकविण्यासाठी दि. 7 मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या दालनात विद्यार्थ्यांसह त्यांचे आई-वडील व ग्रामस्थ बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा माजी सरपंच हनुमंतराव गवळी, रामदास गवळी, गजानन गवळी, घनश्याम गवळी, भाऊसाहेब सुपेकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र भापकर आदींनी दिला आहे.
हेही वाचा
इंस्टाग्रामवर अमली पदार्थाची विक्री प्रकरणात आणखी चार अटकेत
भाजपकडून माझ्या राजीनाम्याची अफवा : मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू
फळपिकांची प्रलंबित नुकसानभरपाई मिळणार !
Latest Marathi News ‘आदर्श’ शाळा सहा वर्षे शिक्षकांपासून वंचित! Brought to You By : Bharat Live News Media.