भाजपकडून माझ्या राजीनाम्याची अफवा : मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : राज्यसभा निवडणुकीनंतर हिमाचल प्रदेशमधील राजकीय घडामोडी कमालीच्या वेगावल्या आहेत. एकीकडे हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव दिल्याचे वृत्त आहे. दरम्यान, भाजप माझ्या राजीनाम्याबाबत अफवा पसरवत असल्याचे सुक्खू यांनी म्हटले आहे.
आम्ही आमचे बहुमत सिद्ध करू
‘एएनआय’शी बोलताना सुखविंदर सिंग सुखू म्हणाले की, मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला अशी अफवा पसरवत आहे. त्यांना विधिमंडळ पक्षात तेढ निर्माण करायची आहे. काँग्रेसच्या आमदार भाजपमध्ये सामील करुन घेण्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. मात्र काँग्रेस एकजूट आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.
मी राजीनामा दिलेला नाही. काँग्रेस सरकार पाच वर्षे पूर्ण करेल. आम्ही लढवय्ये आहोत आणि आम्ही आमचे बहुमत सिद्ध करू,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
#WATCH | Himachal Pradesh CM Sukhvinder Singh Sukhu says “…BJP is spreading rumours of my resignation. They want to create a break in the legislative party. They want Congress MLAs to leave the party and join them. Congress is united…Some of the MLAs who voted for BJP are in… pic.twitter.com/gtkNJOnN6D
— ANI (@ANI) February 28, 2024
काँग्रेसचे पक्ष निरीक्षक पश्रश्रेष्ठींना करणार अहवाल सादर
हिमाचल प्रदेशमधील राजकीय संकटाबाबत ‘एएनआय’शी बोलताना काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले की, “कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा आणि पक्षाचे प्रभारी राजीव शुक्ला हिमाचल प्रदेशमधील नाराज काँग्रेस आमदारांचे म्हणणे ऐकून घेतील. यानंतर ते पक्षश्रेष्ठींना आपला अहवाल सादर करतील.
राज्यसभा निवडणुकीनंतर राजकीय घडामोडी वेगावल्या
राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला धक्का बसल्यानंतर हिमाचल प्रदेशात राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. यादरम्यान काँग्रेस नेते वीरभद्र सिंह यांचा मुलगा विक्रमादित्य सिंह यांनी आज बुधवारी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी आमदारांकडे दुर्लक्ष केल्याचा आणि त्यांचे वडील आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिवंगत वीरभद्र सिंह यांचा अनादर केल्याचा आरोप करत राज्यमंत्री विक्रमादित्य सिंह आज सकाळी मंत्रीपदावरून पायउतार झाले. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांच्या दालनात घोषणाबाजी आणि गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांच्यासह १५ आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. (Himachal political crisis)
काँग्रेसचे ६ आमदार भाजपच्या संपर्कात
राज्यसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशात सत्ताधारी काँग्रेसला मोठा धक्का बसला. तर या निवडणुकीत भाजपने बाजी मारली. हिमाचलमधील राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी भाजपच्या हर्ष महाजन यांनी काँग्रेसच्या अभिषेक मनू सिंघवी यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव केला. यावरून काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे दिसते. यानंतर काँग्रेसचे ६ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे कळते. काँग्रेसचे ६ आमदार आणि ३ अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने राज्यसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा विजय झाला. यामुळे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू सरकार अस्थिर झाले. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी वरिष्ठ नेते भूपिंदर सिंह हुडा आणि डीके शिवकुमार यांना नाराज आमदारांची मनधरणी करण्यासाठी पाठवले आहे. (Rajya Sabha Election 2024)
राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार हर्ष महाजन विजयी झाले. विशेष म्हणजे विधानसभेत काँग्रेसकडे बहुमत असतानाही राज्यसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार विजयी झाला. राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सहा आमदारांनी क्रॉस व्होट केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सत्ताधारी काँग्रेसने राज्यसभेची एकमेव जागा गमावली. काँग्रेस आमदारांच्या संभाव्य बंडखोरीच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून हिमाचल प्रदेश विधानसभेत बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान केल्यानंतर ६ आमदार शिमल्याहून हरियाणाकडे रवाना झाले होते. ते भाजपच्या संपर्कात असल्याचे कळते. राज्यपाल शिवप्रताप शुक्ला यांची भेट घेऊन बहुमत चाचणी घेण्याची मागणी करण्याची भाजपची योजना असल्याच्या वृत्तांमुळे हिमाचल प्रदेशात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Himachal political crisis)
भाजपच्या १५ आमदारांचे निलंबन
दरम्यान, विधानसभा अध्यक्षांच्या दालनात घोषणाबाजी आणि गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांच्यासह विपिन सिंह परमार, रणधीर शर्मा, लोकेंद्र कुमार, विनोद कुमार, हंस राज, जनक राज, बलबीर वर्मा, त्रिलोक जामवाल, सुरेंद्र शोरी, दीप राज, पूरण ठाकूर, इंदर सिंह गांधी, दिलीप ठाकूर आदी १५ भाजप आमदारांवर आज विधानसभा अध्यक्षांनी निलंबनाची कारवाई केली. यामुळे सभागृहाचे कामकाज काहीवेळ तहकूब करण्यात आले.
सरकार स्थापन करण्याची भाजपची तयारी
हिमाचल प्रदेशातील एकमेव राज्यसभेची जागा जिंकणारे भाजप नेते हर्ष महाजन यांनी बुधवारी दावा केला की, सभागृहात ‘बहुमत नसल्यामुळे’ काँग्रेसला बाजूला करुन भाजप राज्यात सरकार स्थापन करणार आहे. महाजन यांनी बुधवारी एएनआयशी बोलताना सांगितले की, काँग्रेसचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत आणि राज्यात सरकार बदलेल.
विधानसभेतील संख्याबळ कसे?
६८ सदस्यीय सभागृहात काँग्रेसचे ४०, भाजपचे २५ आणि तीन अपक्ष आमदार आहेत. भाजपकडे कवेळ २५ आमदार असतानाही भाजपने राज्यसभा निवडणुकीत उमेदवार उभा केला होता. राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग रोखण्यासाठी काँग्रेसने त्यांच्या आमदारांसाठी व्हीप जारी केला होता.
Latest Marathi News भाजपकडून माझ्या राजीनाम्याची अफवा : मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू Brought to You By : Bharat Live News Media.