यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज विविध प्रकल्पाचे लोकार्पण
यवतमाळ : Bharat Live News Media वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज (बुधवार) सायंकाळी ४:३० वाजता येथील नागपूर मार्गावरील डोर्ली शिवारात महिला बचत गटांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमात मोदी यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडू येथून दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचतील. तेथून ते हेलिकॉप्टरने जवाहरलाल दर्डा एअरस्ट्रिप हेलिपॅडकडे रवाना होतील व दुपारी ४:२५ वाजता तेथे पोहोचतील. तेथून कडक बंदोबस्तात त्यांचा ताफा डोर्ली शिवारात कार्यक्रमस्थळी जाईल.
कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राज्यमार्गमंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास व पंचायतराजमंत्री गिरीश महाजन, यवतमाळ-वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, कृषिमंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, केंद्रीय मागासवर्ग आयोग अध्यक्ष हंसराज अहिर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
या समारंभात वर्धा-कळंब या ३९ किमी ब्रॉडगेज रेल्वे लाइनसह प्रवासी रेल्वेचा शुभारंभ होणार आहे. यासोबतच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता आणि पीएम किसान सन्मान निधीचा १६ वा हप्ता वितरित केला जाणार आहे. याशिवाय वर्धा-कळंब या नव्याने साकारलेल्या ३९ किलोमीटरच्या ब्रॉडगेज रेल्वे मार्गासह प्रवासी रेल्वेचा शुभारंभ होईल.
अमळनेर-आष्टी ब्रॉडगेज रेल्वे लाइन (३२ किमी) व प्रवासी रेल्वेचा शुभारंभ, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना तथा बळीराजा जलसंजीवनी योजना या अंतर्गत विदर्भ व मराठवाडा क्षेत्राकरिता सिंचन योजनांचे लोकार्पण होईल, तसेच वरोरा-वणी राष्ट्रीय महामार्ग क्र. ९३० चे चौपदरीकरण, साकोली-भंडारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ सी प्रकल्प आणि सालई खुर्द-तिरोरा महामार्ग क्र. ७५३ प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे. सोबतच यवतमाळ शहरात पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. याचे अनावरणही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत एक कोटी नागरिकांना आयुष्मान कार्ड वितरणाचा शुभारंभ होईल. पीएम किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांच्या निधीचे राज्यातील सुमारे ८८ लाख पात्र शेतकरी कुटुंबांना वितरण होणार आहे.
१९२५ बसेसची व्यवस्था
विविध जिल्ह्यातून परिवहन महामंडळाच्या १ हजार ९२५ बसमधून महिला या मेळाव्यासाठी येणार आहेत. कार्यक्रमासाठी येणाऱ्या प्रत्येक बसमध्ये खाद्य पदार्थांसह पिण्याचे पाणी उपलब्ध राहणार असून, प्रत्येक बससोबत एका समन्वयकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
महिला बचतगटांना देणार ई-वाहतूक वाहने व ड्रोन फवारणी यंत्र
महिलांनी निर्माण केलेल्या विविध वस्तूंना बाजारपेठ मिळावी म्हणून महिला आर्थिक विकास महामंडळ खनिज विकास निधीतून २० बचतगटांना ई-वाहतूक वाहने देणार आहे. यामुळे महिलांना गावपातळीवर या फिरत्या वाहनाच्या माध्यमातून व्यवसायाची संधी उपलब्ध होणार आहे. या शिवाय सीएमआरसीला प्रातिनिधिक स्वरुपात ड्रोन फवारणी यंत्राची चावी दिली जाणार आहे. यामुळे येणाऱ्या हंगामात गाव पातळीवर महिला बचत गटांच्या माध्यमातून ड्रोन फवारणी यंत्राच्या माध्यमातून फवारणी करण्याचे नवे आशादायक चित्र दिसणार आहे.
हेही वाचा :
Rajya Sabha Election 2024 | हिमाचलमध्ये मोठी राजकीय उलथापालथ; काँग्रेसचे सुक्खू सरकार अडचणीत?; क्रॉस व्होटिंगमुळे भाजप उमेदवार विजयी
Farmers Protest | ‘चलो दिल्ली’ मोर्चा : अश्रुधुरामुळे आतापर्यंत ६ शेतकऱ्यांचा मृत्यू
Potato Milk : बटाट्याचे पौष्टिक दूध; कोलेस्टेरॉल फ्री, हाडांसाठीही लाभदायक
Latest Marathi News यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज विविध प्रकल्पाचे लोकार्पण Brought to You By : Bharat Live News Media.