चिमुकला मासा काढतो ड्रिलिंग यंत्रासारखा आवाज!
लंडन : मोठ्या शरीराचा जीवच मोठा आवाज काढतो असे नाही. निसर्गात अनेक थक्क करणार्या गोष्टी पाहायला मिळत असतात. आता जर्मनीची राजधानी बर्लिनमधील संशोधकांनी एक असा चिमुकला मासा शोधला आहे जो चक्क जॅकहॅमरइतका मोठा आवाज काढतो. दगड किंवा काँक्रिट फोडण्यासाठी, ड्रिलिंगसाठी असे यंत्र वापरले जात असते.
हा मासा पारदर्शक शरीराचाही आहे हे विशेष. प्रयोगशाळेतीलच फिश टँकमधून मोठा आवाज येत असल्याने त्यांनी पाहिल्यावर हा पारदर्शक मासा असा आवाज काढत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या माशाचे नाव ‘डॅनिओनेल्ला सेरेब्रम’ असे आहे. हा मासा ‘स्विम ब्लॅडर’ नावाच्या आपल्या अवयवाच्या सहाय्याने असा आवाज निर्माण करतो. या माशाजवळच्या पाण्यात अशा आवाजाचा ध्वनी 140 डेसीबलइतका असल्याचे दिसून आले.
एखाद्या गनशॉटइतका हा आवाज आहे. विशेष म्हणजे हा मासा अवघ्या 12 मिलीमीटर लांबीचा असतो. इतक्या चिमुकल्या आकाराच्या माशाने निर्माण केलेला हा सर्वात मोठा आवाज ठरला आहे. सामाजिक संवादासाठी हे मासे असा आवाज काढत असावेत, असे संशोधकांना वाटते. जलचरांमध्ये आवाज आणि शरीराचा आकार यांचा काहीही संबंध नसतो असे यापूर्वीही आढळले आहे.‘पिस्टल थ्रीम्प’ नावाचा जलचर 200 डेसिबलपर्यंतचा आवाज काढतो असेही यापूर्वी आढळले आहे.
Latest Marathi News चिमुकला मासा काढतो ड्रिलिंग यंत्रासारखा आवाज! Brought to You By : Bharat Live News Media.