रहाणेचे ‘रणजी’तील स्थानही धोक्यात
मुंबई, वृत्तसंस्था : कधीकाळी भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज म्हणून प्रसिद्धीच्या शिखरावर असलेला मराठमोळा अजिंक्य रहाणे आताच्या घडीला देशांतर्गत क्रिकेटमध्येदेखील संघर्ष करत आहे. टीम इंडियातून बाहेर पडल्यानंतर रणजी ट्रॉफीच्या स्पर्धेतील मुंबईच्या संघातूनही बाहेर होण्याची टांगती तलवार रहाणेवर आहे. कारण, मागील दहा डावांमध्ये अजिंक्यला साजेशीही खेळी करता आली नाही. (Ajinkya Rahane)
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रहाणेला भारतीय संघात स्थान मिळाले होते. त्यानंतर त्याने एक द्विपक्षीय मालिका खेळली; पण त्याचा फ्लॉप शो कायम राहिला. अजिंक्य रहाणेने आपल्या टिकाऊ फलंदाजीच्या जोरावर भारताला अनेक सामने जिंकून दिले आणि अनेक सामन्यांत भारताला पराभवापासून वाचवले आहे. फलंदाजीत चिवट असलेला रहाणे कालांतराने टेस्ट स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यामुळे त्याच्याकडे भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. (Ajinkya Rahane)
रहाणेचा सध्याचा फॉर्म पाहता रहाणे मुंबई संघातूनही बाहेर जाईल, असे दिसते. तो सध्या रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईच्या संघाचा कर्णधार आहे; पण त्याची बॅट शांत आहे. मागील काही डावांमध्ये त्याला चांगल्या धावा करता आल्या नाहीत. त्यामुळे मुंबई संघातही टिकून राहणे त्याच्यासाठी कठीण आहे.
मुंबईच्या दहाव्या क्रमांकाच्या फलंदाजाने या हंगामात रहाणेपेक्षा एका डावात जास्त धावा केल्या. संपूर्ण हंगामात रहाणेने केलेल्या धावांपेक्षा तुषार देशपांडेने एका सामन्यात जास्त धावा केल्या आहेत. मुंबईचा 10 व्या क्रमांकाचा फलंदाज तुषार देशपांडेने रणजी ट्रॉफी उपांत्यपूर्व फेरीत बडोद्याविरुद्ध 123 धावा केल्या. रहाणेने या हंगामात एकूण 10 डावांमध्ये 0, 0, 16, 8, 9, 1, 56*, 22, 3 आणि 0 धावा केल्या. रहाणेने संपूर्ण हंगामात केवळ 115 धावा केल्या आहेत. तुषार देशपांडे एकाच सामन्यात रहाणेच्या पुढे गेला.
रहाणेचा खराब फॉर्म हा चिंतेचा विषय आहे. तो मुंबईच्या संघाचा कर्णधार असल्यामुळे कदाचित त्याचे संघातील स्थान कायम आहे. मात्र, रहाणेचा फॉर्म असाच कायम राहिल्यास त्याला टीम इंडियात पुनरागमन करणे अशक्य होईल आणि त्याला मुंबई संघातूनही वगळले जाऊ शकते.
The post रहाणेचे ‘रणजी’तील स्थानही धोक्यात appeared first on Bharat Live News Media.