इतर आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : अन्य कोणत्याही तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मंगळवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. याबाबत शासनाची भूमिका ठाम आहे, आरक्षणासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री सहकुटुंब कोल्हापुरात आले होते. दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण दिले जाईल, आरक्षण देण्याची सरकारचीच जबाबदारी आहे. त्याकरिता सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले सरकारने उचलली आहेत. याकरिता निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. ही समिती राज्यभर काम करत आहे. सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे.
मागासवर्ग आयोगाची पुण्यात बैठक झाली. मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी, त्याबाबतचे सर्वेक्षण करण्यासाठी वेळ लागेल, असे सांगितले जाते. याबाबत बोलताना याचा कोणताही परिणाम मराठा आरक्षणावर होणार नाही. इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचेही काम वेगाने केले जाईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
जालना येथे धनगर समाजाचे आंदोलन सुरू आहे. आंदोलकांचे निवेदन स्वीकारण्यास विलंब केल्याने जमावाने दगडफेक, तोडफोड केल्याचा प्रकार झाला आहे. याबाबत विचारले असता याविषयी अधिक माहिती नाही. मात्र, या सर्व प्रकरणाची माहिती घेतली जाईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, शिवसेना जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, रवींद्र माने आदी उपस्थित होते.
जरांगे-पाटलांच्या सभा माझ्या विरोधातील नाहीत
मनोज जरांगे-पाटील यांची ठाण्यात सभा झाली. राज्यभर सभा होत आहेत. याविषयी विचारता मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, जरांगे-पाटलांच्या सभा माझ्या विरोधातील नाहीत. त्या सरकार विरोधातीलही नाहीत. ते कार्यकर्त्यांना भेटत आहेत. लोकांत जनजागृती करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
The post इतर आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे appeared first on पुढारी.
कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : अन्य कोणत्याही तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मंगळवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. याबाबत शासनाची भूमिका ठाम आहे, आरक्षणासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री सहकुटुंब कोल्हापुरात आले होते. दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद …
The post इतर आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे appeared first on पुढारी.