उपविभागीय अधिकार्यांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर; दोघांना अटक
कोडोली, Bharat Live News Media वृतसेवा : पन्हाळा उपविभागीय अधिकारी यांचा बनावट शिक्का तयार करून व खोटी स्वाक्षरी करून बनावट बांधकाम परवाना तयार केल्या प्रकरणी राजवर्धन प्रकाश पाटील (वय 35, रा. देशमुखवाडा कोडोली) व पृथ्वीराज मोहन दळवी (34, रा. पन्हाळा) यांना कोडोली पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. याची फिर्याद पन्हाळा उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे अव्वल कारकून सुशांत पाटील यांनी दिली.
कोडोली येथे शेंडे कॉलनीतील सुहास सुकुमार कार्वे (रा. कोडोली) यांचा गट नं. 583 पैकी 29 मध्ये प्लॉट असून या जागेवर बांधकाम करण्यासाठी त्यांना परवाना होता. राववर्धन व पृथ्वीराज यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडून परवाना मिळवून देतो. त्यासाठी 60 हजार रुपये देण्याचा व्यवहार ठरला. कार्वे यांनी राजवर्धनला साठ हजार दिले.
या मोबदल्यात त्याने उप विभागीय अधिकारी यांचा बनावट शिक्का तयार केला. उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांची बनावट सही करून घर बांधकाम परवाना कार्वे यांना दिला. हे प्रकरण बॅक कर्जासाठी पन्हाळा उपविभागीय कार्यालयाकडे कडे आले असता हा दाखला आपल्या कार्यालयाकडून देण्यात आला नसल्याचे व तो बनावट असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी कार्वे यांच्याकडे चौकशी केली असता राजवर्धन पाटील व पृथ्वीराज दळवी या दोघांनी संगनमताने करून आपल्याकडून साठ हजार रुपये घेऊन हा दाखला दिल्याचे सांगीतले.
या प्रकरणी खोटा शिक्का व खोटी सही करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास कोडोली ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक एन. बी. दांडगे करत आहेत.
Latest Marathi News उपविभागीय अधिकार्यांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर; दोघांना अटक Brought to You By : Bharat Live News Media.