कुणालाही एकटे पडू देणार नाही : शरद पवार
पुणे; Bharat Live News Media वृत्तसेवा : काही लोकांकडून दबाव टाकला जात आहे. निमशासकीय अथवा शैक्षणिक संस्थांमध्ये काम करणार्यांना नोकरीला मुकावे लागेल, अशी धमकी दिली जाते. मात्र अशा प्रकारची कोण दमबाजी करणार असेल तर आम्ही संबंधितांच्या पाठीशी उभे राहू. त्यांना एकटे पडू देणार नसल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिली.
जरांगे यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर पवार म्हणाले, जरांगे यांनी उपोषण सुरू केल्यानंतर त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आजपर्यंत जरांगे यांच्याशी एक शब्दही बोललेलो नाही. अथवा आमची कोणतीही भेट झालेली नाही. अशावेळी जबाबदारीच्या पदावर बसलेले लोक इतके पोरकट बोलतात हे मी महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात कधीच पाहिले नाही.
आंदोलनाच्या चौकशीसाठी एसआयटी नेमण्याच्या घोषणेवर पवार म्हणाले, काय वाटेल ती चौकशी करायची ती करा. न्यायाधीशांची नेमणूक करा. कर नाही त्याला डर कशाला. आमचा या सगळ्याशी काहीही संबंध नाही. जरांगे यांना पहिल्यांदा भेटलो त्यावेळी दोन समाजांमध्ये अंतर वाढेल असे काही करू नका, असे मी त्यांना सांगितले होते, असे सांगून माजी मंत्री आणि आमदार राजेश टोपे यांच्यावर केलेले आरोपही पवार यांनी धुडकावून लावले. सुनेत्रा पवार यांच्या संभाव्य उमेदवारीबद्दल ते म्हणाले, निवडणुकीमध्ये कोणालाही उभे राहण्याचा अधिकार आहे.
आता काय अडकवणार?
बारामती लोकसभा मतदारसंघातील आढावा बैठकीचा संदर्भ देत या मतदारसंघात आपल्याला अडकवून ठेवण्याचा प्रयत्न असल्याच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, लोक मनोभावे सहकार्य करत आहेत. वातावरण अनुकूल आहे. बारामतीमधून आतापर्यंत मी 14 निवडणुका लढलो. त्यातील सात निवडणुका लोकसभेच्या होत्या, तेव्हा 14 निवडणुकांमध्ये अडकून पडलो नाही, तर हे आता काय अडकवणार, असा जोरदार हल्ला त्यांनी विरोधकांवर केला.
Latest Marathi News कुणालाही एकटे पडू देणार नाही : शरद पवार Brought to You By : Bharat Live News Media.