राज्यातील दुसरे भूप्रणाम केंद्र छत्रपती संभाजीनगरात; १ एप्रिलपासून केंद्राची सुरुवात
छत्रपती संभाजीनगर, Bharat Live News Media वृत्तसेवा : भूमीअभिलेख विभागाच्या वतीने पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर राज्यातील दुसरे भूप्रणाम केंद्र छत्रपती संभाजीनगरात सुरु केले जाणार आहे. एकाच छताखाली भूमीअभिलेख विभागाशी संबंधीत सर्व कागदपत्रे या केंद्रातून दिली जाणार असल्यामुळे दलालांचा अटकाव घातला जाणार आहे. १ एप्रिलपासून या केंद्राची सुरुवात करण्यात येर्इल अशी माहिती भूमी अभिलेख विभागाचे अधीक्षक विजय वीर यांनी मंगळवारी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील भूमी अभिलेख कार्यालयात दलालांचा सुळसुळाट वाढला आहे. पीआर कार्डच्या नकला, सातबारा, फेरफारच्या नोंदीसाठी दलालांकडून पैसे उकळले जातात. पिंपरी-चिंचवडमध्ये अशाच प्रकारे नागरिकांकडून पैसे उकळले जात होते. त्यामुळे आयुक्त सुधांशू यांनी दलालांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी सर्व कागदपत्रे एकाच छताखाली मिळावी म्हणून भूप्रणाम केंद्राची स्थापना केली आहे. मोजणी अर्ज, वारस अर्ज, फेरफार, पीआर कार्ड, सातबारा नक्कल अशी कागदपत्रे एकाच छताखाली जागेवरच दिली जाणार आहेत. भूमी अभिलेख प्रबोधिनीमध्ये केंद्र स्थापन केले जाणार आहे. हे केंद्र वातानुकुलीत असणार आहे.
केंद्रासाठी दहा लाखांचा निधी
महाभुमी पोर्टलवरुन घर बसल्या अर्ज करता येतो. नागरिकांनी या पोर्टलचा वापर करावा. मराठवाड्यात भूप्रणाम हे पहिलेच केंद्र उभारले जात आहे. त्यासाठी दहा लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय नुकत्याच १६० वारसांचे अर्ज घेत फायली निकाली काढण्यात आल्या आहेत.
Latest Marathi News राज्यातील दुसरे भूप्रणाम केंद्र छत्रपती संभाजीनगरात; १ एप्रिलपासून केंद्राची सुरुवात Brought to You By : Bharat Live News Media.