शेतकऱ्यांसोबत व्यवहार कसा करावा हे केंद्र सरकारने फ्रान्सकडून शिकावं : काँग्रेसची टीका
नवी दिल्ली; Bharat Live News Media वृत्तसेवा : भारतात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला फ्रान्सच्या अध्यक्षांना अतिथी म्हणून बोलावण्यात आले होते. शेतकऱ्यांसोबत कसा व्यवहार केला पाहिजे, हे त्यांच्याकडून केंद्र सरकारने शिकण्यासारखे आहे, अशी जळजळीत टीका काँग्रेसकडून करण्यात आली. फ्रान्समध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन शेतकऱ्यांना भेटले आणि आम्ही तुमची प्रत्येक गोष्ट ऐकून घेऊ असे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. हा दाखला देत काँग्रेसने केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले.
पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापसिंग बाजवा यांनी दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात ते बोलत होते देशातील शेतकरी आपल्या मागण्यांसाठी राजधानी दिल्लीच्या वेशीवर असताना अश्रुधुराचे नळकांडे फोडणे किंवा विविध आयुधांद्वारे त्यांना इजा पोहोचवणे किंवा तसे प्रयत्न करणे हे कितपत योग्य आहे, असा प्रश्नही यावेळी प्रतापसिंह बाजवा यांनी विचारला. शेतकरी हे कुठल्या पक्षाचे नसून ते देशाचे अन्नदाता आहेत. त्यांच्याबद्दल चुकीचे बोलले जाते. यावर सरकार गप्प का आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समजून घेणे, त्यांना न्याय देणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र सरकारकडून असे होत नाही, असाही आरोप त्यांनी केला.
यावेळी या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्यांवरही त्यांनी भाष्य केले. विविध प्रकारे शेतकऱ्यांना पांगवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून करण्यात आला. त्यामुळे कोणी जखमी झाले तर कोणी अपंग झाल्याचेही ते म्हणाले. सरकारने बळाचा वापर न करता शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत. त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, संवाद साधला पाहिजे आणि हा प्रश्न सोडवला पाहिजे. यापूर्वीही शेतकऱ्यांनी आपल्या प्रश्नांसाठी आंदोलने केली. वर्षभर दिल्लीच्या सीमेवर बसल्यानंतर केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द केले, असेही ते म्हणाले. सोबतच केंद्र सरकार शेतकऱ्यांसोबत चुकीचा व्यवहार करत असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान इतिहासात अनेक वेळा शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आपल्या मागण्या घेऊन आले. विविध सरकारांनी त्यांच्याशी चर्चा केली. मात्र, विद्यमान सरकार चर्चा न करता बळाचा वापर करून त्यांना पांगवण्याचा प्रयत्न करतेय. हे चुकीचे आहे. देशाच्या अन्नदात्याचा हा अपमान आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा
Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणूक २०२४ : वारे कोणत्या दिशेने वाहतेय?; जाणून घ्या केंद्र, राज्यातील ट्रेंड
Maharashtra Budget 2024 : सर्वसमावेशक, सर्वांना न्याय देणारा अर्थसंकल्प : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Latest Marathi News शेतकऱ्यांसोबत व्यवहार कसा करावा हे केंद्र सरकारने फ्रान्सकडून शिकावं : काँग्रेसची टीका Brought to You By : Bharat Live News Media.