ग्रामसभेने निवडलेल्या समितीस परवानगी : निद्रिस्त गणपती यात्रोत्सव सुरू
शेवगाव तालुका : Bharat Live News Media वृत्तसेवा : ग्रामसभेतून निवडलेल्या समितीस आव्हाणे येथील निद्रिस्त गणपतीचा यात्रोत्सव करण्यास धर्मदाय उपायुक्तांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे सोमवारपासून सुरू झालेल्या यात्रोत्सवाचे व्यवस्थापन या समितीकडे सोपविण्यात आले आहे.
राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आव्हाणे बुद्रुक येथील निद्रिस्त गणपतीची यात्रा 26 ते 29 फेब्रुवारी या कालावधीत होत आहे. देवस्थानच्या विश्वस्तांची मुदत सन 2009 मध्ये संपलेली आहे. यापूर्वी ग्रामपंचायत, माजी विश्वस्त व ग्रामस्थ अशा एकमेकांच्या सहकार्याने यात्रोत्सव पार पडत होता. मात्र, साईनाथ झाडे आणि मोहन कोळगे या भाविकांनी विश्वस्तांची मुदत संपलेली असून, देवस्थान ट्रस्टचे बँक खाते गोठविण्यात आल्याचे धर्मदाय उपायुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. सार्वजनिक समितीला यात्रोत्सव साजरा करण्यास परवानगी देण्याची मागणी केली.
त्यानंतर आव्हाणे येथे ग्रामसभा घेण्यात आली. देवस्थानला कायदेशीर विश्वस्त नसल्याने यात्रोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत व सरपंच यांच्या मागणीनुसार यात्रा काळापुरती समिती नेमण्यात आली आहे. त्यामध्ये रवींद्र खैरे (अध्यक्ष), प्रमोद म्हस्के (उपाध्यक्ष), राहुल गोर्डे (सचिव), मोहन कोळगे (कोषाध्यक्ष), संजय कोळगे, सरपंच पांडू वाघमारे व अन्य यांच्यासह गावातील सर्व स्तरातील 26 ग्रामस्थांची समिती नेमण्यात आली आहे. समितीत ग्रामसेवकालाही स्थान देण्यात आले. याबाबतच अहवाल धर्मदाय उपायुक्तांना सादर करण्यात आला. त्यावर देवस्थानचे आर्थिक व्यवहार गोठविलेले असल्याने देवस्थानच्या यात्रोत्सवासाठी गोळा होणारी देणगी व इतर खर्च, तसेच यात्रेचे व्यवस्थापन पाहण्यास अहमदनगर विभागाच्या धर्मदाय उपायुक्त यू. एस. पाटील यांनी सदर समितीस परवानगी दिली आहे.
त्यामुळे यात्रोत्सव ग्रामसभेतून नियुक्त केलेल्या समितीच्या व्यवस्थापनाखाली पार पडत आहे. संजय कोळगे, बबनराव भुसारी, अंबादास कळमकर, बाळासाहेब कोळगे,सुधाकर चोथे यांच्यासह माजी विश्वस्त यामध्ये सहभागी होणार आहेत.
चार दिवस यात्रोत्सव
शेवगाव तालुक्यातील जागृत देवस्थान असलेल्या श्री क्षेत्र आव्हाने येथील निद्रिस्त गणपती यात्रोत्सवाचे आयोजन सोमवारपासून करण्यात आले आहे. हा उत्सव गुरुवार (दि.29) पर्यंत चालणार आहे. कावडीचे पाणी आणण्यासाठी गावातील भाविक सोमवारी मोठ्या संख्येने पैठण येथे रवाना झाले आहेत. पैठणवरून आणलेल्या गंगेच्या पाण्याने बुधवारी (दि.28) श्रींचे गंगा स्नान, अभिषेक व महाआरती होईल. दुपारी बापूसाहेब भुसारी, शिवनाथ घोडेचोर, प्रमोद घाडगे, राजेंद्र घोलप, जगन्नाथ लोटके, अविनाश बेरड, सुरेश पठाडे, विठ्ठल आव्हाड यांच्या वतीने फराळाचे आयोजन करण्यात आले आहे.
दुपारी 3 ते 5 या वेळेत कृष्णा महाराज ताठे (चितळी) यांचे कीर्तन होईल. सायंकाळी 6 वाजता ग्रामस्थ व परिसरातील भजनी मंडळ यांच्या हस्ते पालखीची पूजा होऊन शोभेच्या फटाक्यांच्या आतिषबाजीत पालखीची मिरवणूक निघेल. 7 वाजता आरती व महाअभिषेक होईल. त्यानंतर सुनीलराव पुरनाळे (भगूर) यांनी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. रात्री 9 वाजता आव्हाने येथील श्री दादोबा देव भजनी मंडळ व अमरापूर येथील भैरवनाथ भजनी मंडळ यांचा एकतारी भजनाचा कार्यक्रम होईल. गुरुवारी सकाळी हजेरी यांचा कार्यक्रम होऊन, 4 वाजता कुस्त्यांचा जंगी हंगामा होणार आहे. रात्री 8:30 ते 12:30 महिलांसाठी विशेष ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा
Sai Tamhankar : सईच्या अभिनयाची भूमी पेडणेकरला पडली भुरळ
मनसेचे वसंत मोरे यांनी घेतली शरद पवारांची भेट : राजकीय चर्चेला उधाण
Bird Migration : वातावरणातील बदलामुळे स्थलांतरित पक्षांची संख्या घटली
Latest Marathi News ग्रामसभेने निवडलेल्या समितीस परवानगी : निद्रिस्त गणपती यात्रोत्सव सुरू Brought to You By : Bharat Live News Media.