बोलोली-उपवडे बंधारा धोकादायक! नवीन पुलाची मागणी

आमशी : मोहन कारंडे : बोलोली-उपवडे रस्त्यावरील बंधारा वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक बनला आहे. उपवडे तलावातून येणारे पाणी अडवण्यासाठी बांधण्यात आलेला कोल्हापूर पद्धतीचा हा बंधारा कमकुवत झाला आहे. बंधाऱ्याला गळती लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अवजड वाहनांची वाहतूक होत असताना पुलाला हादरे बसत असून, दुर्घटनेची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. हा बंधारा नव्याने बांधावा, अशी मागणी येथील शेतकरी करत आहेत.
बोलोलीतून उपवडे गावाकडे जाताना हा बंधारा लागतो. उपवडे तलावाचे पाणी अडवण्यासाठी आणि वाहतुकीसाठी हा बंधारा बांधण्यात आला होता. उपवडे गावाला जोडणारा हा एकमेव पूल आहे. बंधाऱ्यावरून सतत वाहतूक होत असते. आरडेवाडी, पाचाकटेवाडी, पेंडूरकरवाडी आदी गावे यामुळे जोडली गेली आहेत. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थीही या बंधाऱ्यावरून ये-जा करतात. अनेक वर्षे याची देखभाल दुरुस्ती झालेली नाही. बंधाऱ्याचा स्लॅब जीर्ण झाला असून काही ठिकाणी भेगा पडल्या आहेत. अवजड वाहने बंधाऱ्यावरून गेल्यावर हादरा बसतो. त्यामुळे बंधारा वाहतुकीस धोकादायक बनला आहे.
पिकांना फटका
शेतकऱ्यांना पाणी उपसा करताना पाण्याच्या साठ्यासाठी हा बंधारा अतिशय उपयुक्त आहे. मात्र, बंधाऱ्याला गळती लागल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पाणीसाठा होत नसल्याने पिकांना मोठा फटका बसत आहे. दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असणारा हा बंधारा कायमचा निकामी होत असल्याने येथे नवीन पूल बांधण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
शेतीसाठी बांधण्यात आलेला बंधारा खूप जुना झाला आहे. पाण्याची गळती सुरू आहे. त्यामुळे उसाला पाणी पुरत नाही. शिवाय बंधारा अरुंद असल्याने वाहतुकीला अडचण येते. नव्याने बंधारा बांधण्याची गरज आहे.
-संभाजी बाटे, ग्रामपंचायत सदस्य
Latest Marathi News बोलोली-उपवडे बंधारा धोकादायक! नवीन पुलाची मागणी Brought to You By : Bharat Live News Media.
