रिल बनविताना भिवंडीतील तरूणाची खाडीत उडी

डोंबिवली : Bharat Live News Media वृत्तसेवा – पश्चिम डोंबिवलीत नव्याने उभारण्यात आलेल्या मोठागाव-माणकोली पुलावर मित्रांसमवेत रिल बनविल्यानंतर एका तरुणाने अतिउत्साहाने शुक्रवारी दुपारी पुलावरून थेट खाडीत उडी मारली. या घटनेने खाडी परिसरात फिरण्यासाठी आलेल्या मित्रांसह अन्य नागरिकांनी ओरडाओरडा करून तरुणाच्या बचावासाठी प्रयत्न केले. परंतु हा तरुण काही वेळाने खाडीत दिसेनासा झाला.
ही माहिती कळताच विष्णूनगर पोलिसांसह अग्निशमन विभागाला कळताच तातडीने मोठागाव खाडी किनारी येऊन बेपत्ता तरुणाचा शोध सुरू केला आहे. या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर तरूणाचे नाव रोहित अशोक मोर्या असून तो २५ वर्षांचा आहे. बेपत्ता तरूण भिवंडीतील साईनगर परिसरात असलेल्या कामतघर येथील साई मंदिर परिसरात राहणारा आहे.
रोहित हा त्याच्या मित्रांसमवेत शुक्रवारी दुपारच्या सुमारास नव्याने उभारण्यात आलेल्या माणकोली पूलावर रिल तयार करण्यासाठी आला होता. मित्रांसमवेत शूटिंग काढून झाल्यावर मित्रांना काही कळण्याच्या आत रोहितने माणकोली पुलाच्या कठड्यावरून खाडीत उडी मारली.
रोहितचा कुणाशी कसल्याही प्रकारचा वाद नव्हता. किंवा तो कोणत्याही तणावाखाली नव्हता, असे त्याच्या मित्रांनी सांगितले. तरीही त्याने हे कृत्य का केले? याबाबत त्याचे मित्र संभ्रमात पडले आहेत. विष्णूनगर पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून तपास सुरू केला आहे.
Latest Marathi News रिल बनविताना भिवंडीतील तरूणाची खाडीत उडी Brought to You By : Bharat Live News Media.
