सुतावरून स्वर्ग! काठीवरील संशयाने पकडली दरोडेखोरांची टोळी

अनेकवेळा गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांना अक्षरश: सुतावरून स्वर्ग गाठावा लागतो. लहानातील आणि अगदी क्षुल्लक वाटणारा पुरावासुद्धा नजरेआड करून चालत नाही. कारण अनेकदा हा क्षुल्लक दिसणारा पुरावाच गुन्हेगारांचा माग काढण्यास समर्थ ठरत असतो. एका पोलिस अधिकार्‍याने अशाच एका किरकोळ वाटणार्‍या बोराच्या काठीचा आधार घेऊन अवघ्या चोवीस तासांत दराडेखोरांची एक टोळी गजाआड केली होती. त्या तपासाची ही … The post सुतावरून स्वर्ग! काठीवरील संशयाने पकडली दरोडेखोरांची टोळी appeared first on पुढारी.

सुतावरून स्वर्ग! काठीवरील संशयाने पकडली दरोडेखोरांची टोळी

गौरव अहिरे, नाशिक

अनेकवेळा गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांना अक्षरश: सुतावरून स्वर्ग गाठावा लागतो. लहानातील आणि अगदी क्षुल्लक वाटणारा पुरावासुद्धा नजरेआड करून चालत नाही. कारण अनेकदा हा क्षुल्लक दिसणारा पुरावाच गुन्हेगारांचा माग काढण्यास समर्थ ठरत असतो. एका पोलिस अधिकार्‍याने अशाच एका किरकोळ वाटणार्‍या बोराच्या काठीचा आधार घेऊन अवघ्या चोवीस तासांत दराडेखोरांची एक टोळी गजाआड केली होती. त्या तपासाची ही चातुर्यकथा…
नाशिक जिल्ह्यातील ओझर गावानजीक दहावा मैल नावाचा एक फाटा असून, याठिकाणी या भागातील काही सधन शेतकर्‍यांची टुमदार बंगल्यांची वस्ती आहे. या वस्तीतच अगदी शेवटच्या टोकाला शेख कुटुंबीयांचा बंगला आहे. 1998 सालातील 22 डिसेंबरच्या मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास या बंगल्यावर दरोडा पडला. पहिल्यांदा घरातील पुरुष मंडळींना जायबंदी केल्यानंतर दरोडेखोरांनी महिलांच्या अंगावरील दागदागिने ओरबडायला सुरुवात केली. महिलांनी आरडाओरडा सुरू करताच, आरडाओरडा केला तर सर्वांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे सगळेजण चिडीचूप झाले. त्यानंतर दरोडेखोरांनी घरातील दागदागिने आणि पैसा-अडका गोळा करून पळ काढला.
हा प्रकार सुरू असतानाच शेख कुटुंबातील एका तरुणाने घराच्या खिडकीतून पळ काढून दहाव्या मैलावरील एका हॉटेलमधून ओझर पोलिसांना फोन करून दरोड्याची माहिती दिली. ओझर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी भगवंतराव मोरे हे नाशिक जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक होते. तेही तातडीने घटनास्थळी रवाना झाले आणि येता येता त्यांनी निफाड उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक शेखर यांनाही तातडीने घटनास्थळी येण्याची सूचना केली. कारण मोरे यांचा शेखर यांच्या गुन्हे तपास पद्धतीवर कमालीचा विश्वास होता. त्यामुळे आपले कार्यक्षेत्र नसतानासुद्धा शेखर हे मोरे यांच्या सूचनेनुसार घटनास्थळी दाखल झाले. पण, स्थानिक पोलिसांना मात्र त्यांच्यादृष्टीने ‘उपर्‍या’ असलेल्या शेखर यांचा या गुन्ह्याच्या तपासातील सहभाग फारसा रूचला नव्हता.
स्थानिक पोलिसांनी पंचनाम्याचे काम सुरू केले होते. तेवढ्यात शेखर यांचे लक्ष घटनास्थळी पडलेल्या एका अडीच-तीन फुटांच्या काठीकडे वेधले गेले. शेखर यांनी ही काठी उचलली आणि तिचे बारकाईने निरीक्षण केले. ती बोराच्या झाडाची काठी होती आणि चार-पाच तासांपूर्वीच ती झाडावरून तोडल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. इथंच शेखर यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि त्यांनी उपस्थित पोलिसांपैकी काहीजणांना आसपास कुठे बोराची झाडे आहेत का, याचा शोध घेण्याचा आदेश दिला.
शेखर यांच्या या आदेशावर स्थानिक पोलिसही बुचकळ्यात पडले. इथं दरोडा पडलाय, त्याचा तपास राहिला बाजूला आणि हा बोराची झाडं काय शोधतोय, अशा विचित्र आणि टिंगलभर्‍या छटा त्यांच्या चेहर्‍यावर उमटल्या. पण, आदेशानुसार पोलिसांनी आसपासच्या परिसरात कुठे बोराची झाडे आहेत का याचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि तासाभरातच शेखर यांची तपासाची दिशाच कशी योग्य आहे, याचा उलगडा झाला. घटनास्थळापासून चार-पाच किलोमीटर अंतरावर एक बोराची बाग होती आणि या बागेतील एका झाडाची एक फांदी नुकतीच तोडलेली दिसत होती. ही तीच काठी होती जी घटनास्थळी मिळून आली होती. याच झाडाखाली एकाच कंपनीच्या आणि एकाच बॅचच्या काही देशी दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि प्रत्येकी सत्तावीस रुपये किमतीची एस. टी.ची सात तिकिटेही पडलेली होती. या तिकिटांच्या पंचिंगवरून संबंधितांनी जवळपास नव्वद किलोमीटर अंतराचा प्रवास केल्याचे स्पष्ट होत होते. शेखर यांनी तातडीने या तिकिटांबाबत एस. टी.च्या नाशिक विभागाकडे चौकशी केली असता, ती तिकिटे नांदगाव-नाशिक बसची असल्याचे स्पष्ट झाले. लागलीच त्या बसच्या चालक-वाहकांना पाचारण करून चौकशी केली असता, घटनेच्या दिवशी रात्री सातजणांनी एकत्रितरीत्या त्या बसमधून प्रवास केल्याचे स्पष्ट झाले. त्याचप्रमाणे ते आपापसात हिंदीत बोलत असल्याचेही बसच्या वाहकाने सांगितले.
नांदगावपासून जवळच्या भागात मनमाड रेल्वेस्थानक आहे. त्यावरून शेखर यांनी असा निष्कर्ष काढला की उत्तरप्रदेशातून रेल्वेने हे दरोडेखोर मनमाडला आले असावेत आणि तिथून एस. टी.ने ते घटनास्थळी रवाना झाले असावेत. ज्याअर्थी दरोडेखोर मनमाडवरून आले, त्याअर्थी ते पुन्हा मनमाडमार्गेच पळून जाणार याची खुणगाठ बांधून शेखर यांनी वायरलेसवरून संपर्क साधून मनमाड रेल्वे स्थानकावर संबंधितांचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना दिले आणि लगोलग त्यांनी आपला मोर्चा मनमाड रेल्वे स्थानकाकडे वळविला. दरम्यान, मनमाड रेल्वे स्थानकावर शेखर यांनी सांगितलेल्या वर्णनानुसार सात लोक मिळून आले. त्यांना पकडताना एकजण हाती लागला आणि बाकीचे सहाजण पळून जाण्यात यशस्वी झाले. ज्याला पकडला तोही काही बोलायला तयार नव्हता आणि ताबडतोब त्याने बेशुद्ध पडल्याचे नाटक केले. त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशात एक देशी दारूची बाटली आणि काही दागिने सापडले. दारूच्या बाटलीचे लेबल आणि बॅच नंबर बघितल्यावर शेखर यांना खात्री पटली की, हाच त्या सातपैकी एक दरोडेखोर आहे. त्याला योग्यरीत्या बंदिस्त करून शेखर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी पुन्हा एकदा मनमाड रेल्वेस्टेशन गाठले.
त्याठिकाणी पाच-सहा महिला एकत्र टोळके करून बसलेल्या दिसल्या. त्यांच्याकडे एक कसलेसे बोचकेही होते. पोलिसांनी या बोचक्याची तपासणी केली असता त्यात काळ्या रंगाची सात बनियन आणि सात हाफ पँटा मिळून आल्या. त्यावरून या दरोडेखोरांच्या बायका असल्याची खात्री पटली; पण त्यांना थेट ताब्यात न घेता पोलिसांनी आहे त्या ठिकाणी गप्प बसण्याचा दम दिला. कारण पोलिसांना ठाऊक होते की, आपल्या बायकांना या ठिकाणावरून घेऊन जाण्यासाठी पळून गेलेल्या दरोडेखोरांपैकी कुणी ना कुणी नक्कीच येणार आणि झालेही तसेच. पळून गेलेल्यापैकी एक दरोडेखोर सकाळी सकाळी आपल्या बायकांना घेऊन जाण्यासाठी आला आणि त्या ठिकाणी साध्या वेशात पाळत ठेवून बसलेल्या शेखर यांच्या ताब्यात सापडला. काही वेळातच दुसरा दरोडेखोर आला आणि तोही पोलिसांच्या कब्जात सापडला. थोड्या वेळाने आणखी दोघे आले आणि पोलिसांनी त्यांच्यावरही झडप घातली. शेवटी अशाच पद्धतीने उरलेले दोघेही पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात अडकले. दरोड्याची घटना घडून अवघे चोवीस तास उलटण्याच्या आतच दरोडेखोरांची सगळी टोळीच्या टोळी जेरबंद करण्यात पालिसांना यश आले. पोलिस उपअधीक्षक शेखर यांनी एका काठीवर घेतलेला संशय कामी आला आणि पोलिस आपली कामगिरी फत्ते करू शकले.
शेखर यांनी इतर पोलिसांप्रमाणेच बोराच्या झाडाच्या त्या काठीकडे दुर्लक्ष केले असते, तर पोलिसांना ते बोराचे झाड, त्याठिकाणी पडलेल्या दारूच्या बाटल्या, एस.टी.ची तिकिटे यापैकी कशाचाही थांगपत्ता लागला नसता आणि त्यामुळे कदाचित दरोडेखोरांचाही थांगपत्ता लागला नसता. दरम्यानच्या काळात कदाचित दरोडेखोर बिनबोभाटपणे उत्तरप्रदेशात पसारही झाले असते आणि पोलिसांवर हात चोळत बसण्याची वेळ आली असती.

Latest Marathi News सुतावरून स्वर्ग! काठीवरील संशयाने पकडली दरोडेखोरांची टोळी Brought to You By : Bharat Live News Media.