उद्धव ठाकरेंचा विषय आमच्यासाठी संपला : फडणवीस

मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा : उदद्धव ठाकरे यांचा विषय आमच्यासाठी संपला आहे, आता पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेशी भाजपची युती होणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटासाठी महायुतीचे दरवाजे बंद झाल्याचे स्पष्ट संकेत शुक्रवारी दिले. (Maharashtra politics)
शिवसेनेसोबत केलेली युती ही भावनिक असून राष्ट्रवादीसोबत केलेली युती म्हणजे राजकीय डावपेच होेते, याचा पुनरूच्चारही फडणवीस यांनी केला. शरद पवारांनी भाजपसोबत युती करण्यासाठी संमती दिली होती. मात्र, प्रत्यक्ष युती करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी माघार घेतली, असा दावाही त्यांनी पुन्हा केला. अशाप्रकारे तुम्ही मला पुढे करून सर्व गोष्टी ठरवल्यात आणि शेवटच्या क्षणी तुम्ही मागे हटत आहात, हा विश्वासघात मी सहन करू शकत नाही, अशी भूमिका अजित पवार यांनी यावेळी घेतली व ते सरकारमध्ये आले, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
फडणवीस यांनी या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचे नाव न घेता त्यांनी पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला. ते म्हणाले, 2019 ला जनतेने आम्हाला बहुमताचे सरकार दिले; पण ते घटनाबाह्य पद्धतीने बेदखल करण्यात आले. 2019 मध्ये जनतेचा जनादेश नाकारला गेला नसता, आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेला नसता, तर कदाचित आज जी राजकीय परिस्थिती दिसते ती दिसली नसती. राज्यात तेव्हाच खूप चांगले स्थिर सरकार आले असते. आम्ही परत आलो आहोत आणि स्थिर सरकार देत आहोत, येत्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आव्हाने आहेत. हे मान्य करतानाच भाजप मित्रपक्ष मिळून 41 पेक्षा जास्त जागा जिंकू, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.
आम्ही शरद पवारांशी बोललो तेव्हा त्यांनी युतीला सहमती दर्शवली. अजित पवार यांना उमेदवारी दिली. पवारांनी चर्चा करून वाटाघाटी करण्याचे अधिकार अजित पवारांना दिले. आम्ही अजित पवारांसोबत सर्वकाही निश्चित केले. मात्र, शेवटच्या क्षणी शरद पवार का मागे हटले हे मला कळत नाही. (Maharashtra politics)
दिल्लीपेक्षा मुंबई बरी
आपल्याला दिल्लीपेक्षा मुंबईच बरी वाटत असल्याचे सांगत फडणवीस यांनी राज्याचे राजकारण सोडून देशाच्या राजकारणात जाणार असल्याची चर्चा फेटाळली. दिल्लीपेक्षा मुंबईचे वातावरण चांगले आहे, असेही फडणवीस म्हणाले.
‘पंतप्रधान मोदींना पर्याय नाही’
लोकसभा निवडणुकीत 400 चा आकडा पार करण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात खूप काम केले आहे. प्रत्येक जात, धर्म आणि वर्गाच्या लोकांना वाटतं की देशाला त्याच्या गंतव्यस्थानावर कोणी नेऊ शकत असेल तर ते मोदीच आहेत. त्यांच्यापुढे कोणताही पर्याय सध्या दिसत नाही.
Latest Marathi News उद्धव ठाकरेंचा विषय आमच्यासाठी संपला : फडणवीस Brought to You By : Bharat Live News Media.
