हिंगोलीत भरधाव पिकअपने भाविकांना उडवले, ४ जण ठार

हिंगोली, Bharat Live News Media वृत्तसेवा : हिंगोली ते कनेरगावनाका मार्गावर माळहिवरा शिवारात भरधाव पिकअप वाहनाने भाविकांना पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात ४ जण ठार तर ४ जण जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मयत व जखमी सिरसम (ता. हिंगोली) येथील रहिवासी आहेत. जखमींवर हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Hingoli Accident)
तालुक्यातील सिरसम येथील भाविक दर शनिवारी सिरसम येथून पायी माळहिवरा फाटा येथील हनुमान मंदिरात दर्शनासाठी येतात. नेहमी प्रमाणे हे भाविक शनिवारी पहाटेच सिरसम येथून माळहिवरा येथे पायी निघाले होते. सर्व भाविक माळहिवरा शिवारात आले असताना हिंगोलीकडून अमरावतीकडे भाजीपाल्याचे रिकामे कॅरेट घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाने भाविकांना पाठीमागून धडक दिली. (Hingoli Accident)
या अपघातात मनोज गोपाळराव इंगळे (वय ३९), बालाजी बाबुराव इंगळे (वय ३२), सतिश शंकरराव थोरात (वय २७), वैभव नंदू कामखेडे (वय २२) यांचा मृत्यू झाला, तर जगन प्रल्हाद अडकिणे, उत्तम संतोष गिरी, संतोष सिताराम वसू, राजकुमार भिकाजी घाटोळकर (सर्व रा. सिरसम) हे जखमी झाले आहेत.
या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी तसेच हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय रामोड, जमादार अनिल डुकरे, आकाश पंडीतकर, किशोर पवार यांच्या पथकाने सर्वांना हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. जखमींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे समजते. या अपघातानंतर पिकअप चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा :
ट्रॉलीचा हूक तुटून दुचाकीला धडक; पिता-पुत्राचा मृत्यू
मनोज जरांगेंच्या सहकाऱ्याच्या गाडीवर हल्ला, अज्ञातांकडून वाहनाची तोडफोड
लातूर : देवणीत पुन्हा एक अल्पवयीन मुलीचा विनयभंग
Latest Marathi News हिंगोलीत भरधाव पिकअपने भाविकांना उडवले, ४ जण ठार Brought to You By : Bharat Live News Media.
