मच्छीमारांच्या मानगुटीवर सौरऊर्जा प्रकल्पाचे भूत : प्रकल्पाला विरोध

भरत मल्लाव
भिगवण : संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणानंतर आता उजनी धरणातही सौरऊर्जा प्रकल्प उभा करण्याचे संकेत मिळत आहेत. या प्रकल्पामुळे आधीच धोक्यात सापडलेल्या राज्यातील सर्वात मोठे माशांच्या कोठराला आणखी दुसरा मोठा धक्का मानला जात आहे. येथील पिढीजात मच्छीमार आधीच भाकरीच्या शोधात संघर्ष करत असताना आता या सौरऊर्जा प्रकल्पाचे भूत मानगुटीवर बसणार असल्याने हजारो मच्छीमारांच्या रोजगारावर मोठे संकट उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जायकवाडी धरणातील सौरऊर्जा प्रकल्पाचे काम हाती घेताच स्थानिक मच्छीमारांनी या प्रकल्पाला कडवा विरोध चालवला आहे. उजनीतील मच्छीमारही या सौर प्रकल्पाच्या विरोधात प्राण पणाला लावण्याचा निर्धार आताच व्यक्त करू लागले आहेत. वास्तविक जायकवाडीच्या आधीच उजनीत हा प्रकल्प येणार होता, नंतर तो मागे पडला. आता पुन्हा नव्याने याची चर्चा सुरू झाल्याने स्थानिक मच्छीमारांच्या अडचणीत भर पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. उजनीतील प्रदूषण व व्यावसायिक मासेमारीमुळे आधीच येथील मच्छीमार मेटाकुटीला आला आहे. माशांच्या जवळपास पन्नासहून अधिक जाती नामशेष झाल्या आहेत. एकेकाळी गोड्या पाण्यातील माशांचे सर्वात मोठे कोठार म्हणून उजनीकडे पाहिले जात होते. चविष्ठ माशांमुळे आजही राज्यातील मत्स्यप्रेमी जिभेचे चोचले पुरवण्यासाठी उजनीकडे वळतात. उजनीतील स्थानिक मासेमारीचा प्रश्न मात्र गेल्या 30 वर्षांपासून चिघळला आहे.
धरणातील जैविक व मत्स्यसंपदा प्रदूषणामुळे पूर्णपणे धोक्यात आली आहे. स्थानिक पिढीजात मच्छीमार हक्काच्या रोजगारासाठी सातत्याने गेली 30 वर्षे आंदोलने छेडत आला आहे. या व्यवसायाला राजकीय नेत्यांची दृष्ट लागल्यापासून मासेमारी व्यवसाय गेल्या 17 वर्षांपासून लाल फितीत अडकून पडला आहे,त्यातच आता सौरऊर्जा प्रकल्पाचे भूत मानगुटीवर बसण्याचे संकेत मिळू लागल्याने मच्छीमार गर्भगळीत झाला आहे. पुन्हा एखादा निकराच्या लढ्यासाठी तो तयार असल्याच्या प्रतिक्रिया देऊ लागला आहे.
मच्छीमारांना प्रकल्पाखाली गाडा
या प्रकल्पाबाबत उजनी मच्छीमार आंदोलनाचे नेते चंद्रकांत भोई म्हणाले की, गेली 30 वर्षे आमच्यावर अन्याय होत आला आहे. हक्काचा व्यवसाय हिरावून घेतला आहे. त्याच्या लढाईत आमच्या दोन पिढ्या गेल्या आहेत.आता हा प्रकल्प उजनीत आणणार असाल, तर जिथे तो प्रकल्प उभा करण्यात येणार आहे त्या खाली एकदाचे सर्व मच्छीमार गाडून टाका म्हणजे आम्ही उघड्यावर तरी येणार नाही.
एकदाची संस्कृती संपवा
उजनीमुळे विस्थापित झालो, कुठेतरी मासेमारीवर उदरनिर्वाह सुरू आहे, या व्यवसायावर आधीच घरघर लागली, त्यावर अतिक्रमण झाल्याने आमचा मच्छीमार देशोधडीला लागला आहे. आणि वरून प्रकल्प लादणार असाल, तर एकदाचा मच्छीमार समाजच संपवूनच टाका म्हणजे मच्छीमार संस्कृतीच नाहीशी होऊन जाईल.
मच्छीमारांचे आधी पुनर्वसन करा
मच्छीमारांचे युवा प्रतिनिधी अनिल नगरे, बलभीम भोई म्हणाले की, आधीच रोजगारासाठी आमचा मच्छीमार तीळ तीळ जळतोय, त्यात असा प्रकल्प येणार असेल, तर आधी मच्छीमारांचे पुनर्वसन करा, त्यांना नोकर्या, रोजगार उपलब्ध करून द्या, घरे
दारे बांधून द्या, पुढच्या अनेक पिढ्यांचा
विचार करून नियोजन करा आणि मगच प्रकल्प हाती घ्या.
उपजीविकेचीच धरणे दिसतात
अशा सौरऊर्जा प्रकल्पाला शासनाला समुद्र किंवा अनेक पडीक जलाशय दिसत नाहीत का ? जिथे हजारो मच्छीमारांची उपजीविका चालते तिथेच प्रकल्प कसे येतात, असा प्रश्न अॅड. पांडुरंग जगताप व अॅड.विशाल मल्लाव यांनी केला.गोरगरिबांच्या जगण्याचे साधन काढून घेणे हा कसला विकास आहे, उजनीच्या मासेमारी व्यवसायावर पिढीजात इतर सर्व जाती-धर्माच्या लोकांची उपजीविका चालते त्यामुळे प्रकल्पाच्या विरोधात न्यायिक लढाई लढू.
अंत पाहू नका…
उजनीतील मच्छीमारांचे जीवन आधीच अर्धे मेले झाले आहे. रोज तो उपजीविकेसाठी संघर्ष करतो आहे. मासेमारी व्यतिरिक्त जगण्याचे इतर कुठलेही साधन या समाजाला उपलब्ध नाही.त्यामुळे प्रकल्प माथी मारून आता आमचा अंत पाहू नका, अशी संतप्त प्रतिक्रिया येत आहे.
हेही वाचा
जाती पातीची भांडणे लावणाऱ्यांपासून सावध राहा : सुषमा अंधारे
शिरूरच्या स्ट्राँग रूमची जिल्हाधिकार्यांकडून पाहणी
राजगडावरील तलावांचे पाणी दूषित; पहारेकर्यांसह पर्यटकांचे हाल
Latest Marathi News मच्छीमारांच्या मानगुटीवर सौरऊर्जा प्रकल्पाचे भूत : प्रकल्पाला विरोध Brought to You By : Bharat Live News Media.
