मनोहर जोशी यांच्या निधनाने सुसंस्कृत नेतृत्व हरपले; नाना पटोले

मुंबई, Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्याचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या निधनाने एक निष्ठावंत, अभ्यासू, अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
मनोहर जोशी यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करून पटोले म्हणाले की, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून आलेल्या मनोहर जोशी यांनी अत्यंत निष्ठेने आणि मेहनतीने मुंबईचे नगरसेवक, महापौर, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, लोकसभा अध्यक्ष असा प्रदीर्घ राजकीय प्रवास केला. आपल्या राजकीय जीवनात त्यांनी अनेक चढउतार पाहिले. पण कधीही निष्ठा आणि विचारांशी तडजोड केली नाही.
आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी ते लढत राहिले. राजकारणासोबतच महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, कला क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी जोशी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे पटोले म्हणाले.
हेही वाचा
Manohar Joshi : शिवसेनेचा ‘कोहिनूर’ हरपला; माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन
Manohar Joshi : मनोहर जोशी अखेरच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणून जगले : संजय राऊत
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना ह्रदयविकाराचा झटका; रूग्णालयात उपचार सुरू
Latest Marathi News मनोहर जोशी यांच्या निधनाने सुसंस्कृत नेतृत्व हरपले; नाना पटोले Brought to You By : Bharat Live News Media.
