मुले मोठ्या व्यक्तींच्या विरोधात सूड का उगवतात? जाणून घ्या ‘ओडीडी’विषयी

मी ज्या भागात वैद्यकीय प्रॅक्टिस सुरू केली त्या भागात कमालीचे दारिद्य्र होते. सुरुवातीच्या तीन-चार वर्षांत माझ्याकडे येणारे बहुसंख्य पेशंट हे गरीब आणि कष्टकरी वर्गातले होते. एके दिवशी माझ्या दवाखान्यात सात वर्षांच्या मुलाला घेऊन त्याची आई आली. मुलाला मी तपासल्यावर, त्याला इंजेक्शन द्यावे लागेल, असे म्हणालो. तसा तो टेबलावर आरडाओरडा करत उभा राहिला… जोरजोरात पाय आपटून … The post मुले मोठ्या व्यक्तींच्या विरोधात सूड का उगवतात? जाणून घ्या ‘ओडीडी’विषयी appeared first on पुढारी.
मुले मोठ्या व्यक्तींच्या विरोधात सूड का उगवतात? जाणून घ्या ‘ओडीडी’विषयी

– डॉ. प्रदीप पाटील (क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, सांगली)

मी ज्या भागात वैद्यकीय प्रॅक्टिस सुरू केली त्या भागात कमालीचे दारिद्य्र होते. सुरुवातीच्या तीन-चार वर्षांत माझ्याकडे येणारे बहुसंख्य पेशंट हे गरीब आणि कष्टकरी वर्गातले होते. एके दिवशी माझ्या दवाखान्यात सात वर्षांच्या मुलाला घेऊन त्याची आई आली. मुलाला मी तपासल्यावर, त्याला इंजेक्शन द्यावे लागेल, असे म्हणालो. तसा तो टेबलावर आरडाओरडा करत उभा राहिला… जोरजोरात पाय आपटून दवाखाना दणाणून सोडला आणि अत्यंत अश्लील शिव्या त्याने मला द्यायला सुरुवात केली! तसे त्याच्या आईने त्याच्या कानाखाली तीन-चार लगावल्या. त्यावर त्याने आईच्या हाताला चावा घेतला आणि माझ्याकडे बघत रागाने टेबलावरून उडी मारून दवाखान्याच्या बाहेर धूम ठोकली!!
त्याची आई माझी माफी मागू लागली. पण, जेव्हा मी तिला विचारले, असे तो केव्हापासून करतो आहे? तेव्हा तिने पाढाच वाचला… जेव्हा काही आम्ही त्याला सांगायला जातो, तेव्हा तो प्रचंड किंचाळून आरडाओरडा करतो आणि त्याला स्वतःचे सुद्धा भान राहत नाही. साध्या साध्या गोष्टींमध्ये तो चिडत राहतो. सतत संतापलेल्या अवस्थेमध्ये किंवा रागाने बड बडबडत राहत असतो. बापाचे सुद्धा ऐकत नाही. बाप दारू पिऊन येतो; पण यानं जर दंगा केला तर बाप याला पट्ट्याने फोडून काढतो. एकदा तर याच्या बापाने हात एवढा पिरगळला होता की प्लास्टर घालायची वेळ आली होती. घरात कोणाचंच तो ऐकत नाही. माझं, आमच्या सासूबाईचं, सासर्‍यांचं, कोणाचंही ऐकत नाही. सारखं चीड येईल, असं वागत असतो.
दुसरं कोणी काही चुकीचं बोललं किंवा वागलं की याला खूप आनंद होतो आणि त्याला वाटेल तसा बोलायला सुरुवात करतो. एकदा तर म्हणाला मला शाळेत एका मुलाला मारायचं आहे, मी चाकू घेऊन त्याला मारूनच टाकणार आहे! तेव्हापासून मी लई घाबरून आहे बघा डॉक्टर. बापाला सांगितलं तर बाप नुसता त्याला मारत असतो. त्याचवेळी मी त्या माऊलीला म्हणालो, बाई, तुझा मुलगा मोठेपणी गुंडच होणार बघ, जर तो सुधारला नाही तर…आणि घडले तसेच. त्याने तरुणपणात पदार्पण केल्यावर दोन खून केले आणि चार-पाच हाणामारीच्या केसेस त्याच्या नावावर नोंदल्या गेल्या. काही वर्षांपूर्वीच त्याचाही खून झाला.
ऑपोझिशनल डिफायंट डिसऑर्डर : लहानपणी वयाच्या सहाव्या ते आठव्या वर्षांपर्यंत जेव्हा मुले अशी लक्षणे दाखवू लागतात तेव्हा त्यांना उर्मटपणे अपमान करून उलटेच वागणारा रोग जडला आहे, असे समजावे. इंग्रजीमध्ये याला ऑपोझिशनल डिफायंट डिसऑर्डर किंवा ओडीडी असे म्हणतात. या रोगामध्ये ही मुले नेहमी आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणार्‍या व्यक्तींच्या विरोधात मनात राग आणि सूड धरून असतात. विशेषत: आपले आई-वडील, शिक्षक आणि काही वेळा पोलिस किंवा अधिकारी.
गुन्हेगारीची जनुके! : जर असे वर्तन घरामध्ये आढळून आले तर त्याच्यावर विशेष लक्ष ठेवणे अत्यावश्यक असते. पण, जर हेच वर्तन शाळेमध्ये आणि समाजामध्ये सुद्धा तसेच चालू राहिले, तर मात्र हा रोग गंभीर समजून त्याच्यावर उपचार करण्याची गरज असते. मुलांना शिक्षा म्हणून जर घरातली व्यक्ती मारहाण करत असेल किंवा इजा करत असेल तर अशी मुले या रोगाला बळी पडू शकतात. विशेषतः आशियाई, आफ्रिकन, लॅटिनो देशांमध्ये मुलांना मारणे गंभीर समजले जात नाही. जर अशा मुलांमध्ये एडीएचडी किंवा अती कडमडेपणा हा रोग असेल तर निश्चितपणे ही मुले पुढे गुन्हेगारी वृत्तीची बनतात. जर जनुके बिघडलेली असतील तर मेंदूतील रसायने किंवा न्यूरोट्रान्समीटर्स देखील बिघडतात आणि रोगाची निर्मिती होते.
एखाद्या गोष्टीचे कारण शोधणे किंवा एखाद्या बाबतीत निवाडा देणे व आपल्या सणकीपणावर नियंत्रण ठेवणे असे मेंदूमध्ये कार्य करणारे जे भाग असतात, त्या भागांमध्ये दोष निर्माण झाला तर हा ओडीडी नावाचा रोग निर्माण होण्याची शक्यता वाढते. मेंदूतील अमिग्डाला, कपाळा मागील भाग आणि बी. ए. एस. नावाची मेंदूतील यंत्रणा ज्याला इंग्रजीत, बिहेवियरल ऍक्टिवेशन सिस्टीम असे म्हणतात अशा अनेक भागांच्या दोषांमधून ओडीडी या रोगाची निर्मिती होते.
कॉग्निटीव्ह डिस्टॉर्शन्स! : अशा प्रकारची बहुसंख्य मुले हे सामाजिक नियम धुडकावून लावणारे असतात आणि एखादी सामान्य कृती देखील त्यांना धोक्याची वाटून त्याचा विपरीत अर्थ ते काढत असतात. ज्याला कॉग्निटीव्ह डिस्टॉर्शन्स असे म्हणतात. समाजाविषयी त्यांना अतिशय कमी माहिती असते आणि त्यामुळे समस्या सोडवणुकीची तंत्रे त्यांना अवगत नसतात. जेव्हा शाळांमधून किंवा समाजातून अशी मुले दुर्लक्ष केली जातात, त्यांना समजून घेतले जात नाही, पालक हे मुलांच्या पालकत्वाबाबतीत उदासीन असतात तेव्हा या रोगाला आमंत्रण दिले जाते. ओडीडी बरा करणे हे एकट्या-दुकट्याचे काम नसते. त्यासाठी विविध क्षेत्रातील काऊंसिलर्स आणि मनोरोगतज्ज्ञ यांच्या एकत्रित उपचारातून तो बरा होणार की नाही, हे ठरत असते. जर वेळीच उपचार केले, तर अशी मुले पुढे गुन्हेगार होण्यापासून वाचतात. पण, दुर्लक्ष केले तर निश्चितपणे ही मुले ‘भाई’ व्हायला वेळ लागत नाही!!

Latest Marathi News मुले मोठ्या व्यक्तींच्या विरोधात सूड का उगवतात? जाणून घ्या ‘ओडीडी’विषयी Brought to You By : Bharat Live News Media.