फुलांचा वर्षावाचे ‘ते’ निरोप समारंभ दिखावाच : रश्मी शुक्ला यांनी दिली तंबी

पिंपरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्याची बदली झाल्यानंतर फुलांचा वर्षाव करीत संबंधित अधिकार्याला निरोप देण्याचे ’फॅड’ सध्या पोलिस दलात दिसून येत आहे. निरोप समारंभाचे व्हिडीओ सोशल मीडियावर जाणीवपूर्वक व्हायरल करून, आमचे साहेब कसे देव होते, असे चित्र उभे केले जाते. मात्र, अशा प्रकारचे निरोप समारंभ बोगस असून, संबंधित अधिकार्याने आपल्या हस्तकांमा़र्फत प्रसिद्धीसाठी केलेला ’स्टंट’ असल्याचे मत महासंचालक रश्मी शुक्ला यांनी व्यक्त केले आहे. यापुढे असे कृत्य करणार्यांची गय केली जाणार नसल्याचे घटकप्रमुखांना पत्राद्वारे कळवले आहे.
मागील काही वर्षांपासून ठाण्यातून बदलून जाणार्या प्रभारी अधिकार्यांचा मोठा निरोप समारंभ करण्याची प्रथा सुरू झाली आहे. यातील विशेष बाब म्हणजे मोठ्या ठाण्यांच्या अधिकार्यांचे पंचतारांकित हॉटेल्समध्ये कार्यक्रम घेतले जातात. अधिकारी कितीही भ्रष्ट किंवा नाकर्ता असला तरीही त्याच्या गुणांचे यथेच्छ गोडवे गायले जातात. संबंधित अधिकार्यांचे वसुली पंटर उपकाराची छोटीशी परतफेड म्हणून असे कार्यक्रम आयोजित करतात. पोलिस ठाण्यातून निघताना संबंधित अधिकार्यांवर मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी केली जाते. त्यावेळी ठरल्याप्रमाणे मोबाईलवर व्हिडीओ चित्रित केले जातात. त्यानंतर हस्तकांमार्फत वेगवेगळे कॅप्शन देऊन व्हिडीओ पोस्ट केले जातात. मात्र, गणवेशावर असतानाचे हे कृत्य शिस्तीला धरून नसल्याचे मत महासंचालक रश्मी शुक्ला यांनी व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे.
बदली ही नित्याचीच बाब
महाराष्ट्र राज्य पोलिस दलातील विविध दर्जाचे पोलिस अधिकारी, अंमलदार यांच्या शासन नियमानुसार तसेच प्रशासकीय कारणास्तव बदल्या होत असतात. बदली ही एक नित्याची बाब आहे. मात्र, बदली झालेल्या पोलिस अधिकारी यांच्या सन्मानार्थ विविध पोलिस ठाणे, शाखांमध्ये निरोप समारंभ आयोजित केले जातात. अशा समारंभांमध्ये संबंधित पोलिस अधिकारी गणवेश परिधान केलेला असताना त्यावर रंगीत फेटे बांधतात. त्यांच्यावर फुलांचा मोठ्या प्रमाणात वर्षाव केला जातो, त्यांना वाहनात बसवून वाहन दोरीने ओढत नेले जाते. तसेच, शासकीय वाहनात बसवून सेवानिवृत्त होणार्या अधिकार्यांसारखा त्यांना निरोप दिला जातो, असे प्रकार पोलिस दलाच्या प्रमाणित कार्यपद्धतीस अनुसरून नसल्याचे रश्मी शुक्ला यांच्या पत्रात नमूद आहे.
जनमाणसात चेष्टा
पुष्पवृष्टी सोहळ्याचा कार्यक्रम प्रभारी अधिकारी स्वतः किंवा त्यांच्या हस्तकामार्फत आयोजित करतात. याचे व्हिडीओ प्रसिध्दी मिळविण्यासाठी सोशल मीडियावर प्रसारीत करतात. अशा प्रकारचे व्हिडीओ जनमाणसात चेष्टेचा विषय बनत असल्याचे मत रश्मी शुक्ला यांनी नमूद केले आहे.
…तर घटक प्रमुखच जबाबदार
अखत्यारित असलेल्या पोलिस अधिकार्यांचे अशा प्रकारे निरोप समारंभ केले जाणार नाहीत, याची सर्वस्वी जबाबदारी घटक प्रमुखांवर सोपवण्यात आली आहे. तसेच, पोलिस महासंचालकांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास संबंधितांविरुध्द कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
हेही वाचा
असे असेल हडपसरचे नवीन रेल्वे टर्मिनल !
माजी राज्यपाल मलिक यांच्यावर सीबीआयचे छापे
Election 2024 | निवडणुकीसाठी मनपाचे ५० कर्मचारीवर्ग
Latest Marathi News फुलांचा वर्षावाचे ‘ते’ निरोप समारंभ दिखावाच : रश्मी शुक्ला यांनी दिली तंबी Brought to You By : Bharat Live News Media.
